अलीकडे वाढत्या स्वैराचारामुळे महिलांशी संबंधित अत्याचाराचे प्रकार वाढत असतानाच आता पुन्हा ‘व्हॅलेन्टाइन डे’च्या नावाखाली युवा पिढीकडून धुडगूस घातला जात आहे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण व मेकॉलेची शिक्षणप्रणाली यामुळे सर्वत्र स्वैराचार माजला आहे. ही अधोगती रोखण्यासाठी ‘व्हॅलेन्टाइन डे’सारखी विकृती सोडून भारतीय संस्कृती दिन साजरा करावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने केले आहे. त्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी युवकांशी संवाद साधला जात असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते योगेश व्हनमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘व्हॅलेन्टाइन डे’चे दुष्परिणाम दाखवून देणाऱ्या १० हजार १०० हस्तपत्रकांचे महाविद्यालये, खासगी क्लासेस तसेच विविध गर्दीच्या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे. सोलापूर शहर व परिसरासह शेजारच्या मराठवाडय़ातील १८व्याख्यानांच्या माध्यमातून सहा हजार विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले आहे. ९२ महाविद्यालयांच्या प्राचार्याना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आल्याचे योगेश व्हनमारे यांनी नमूद केले. या वेळी राजश्री तिवारी, लतिका पैलवान, केतकी येळेगावकर यांची उपस्थिती होती.