सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवांसाठी वर्गणीऐवजी परिसर स्वच्छतेसाठी प्रोत्साहनपर पारितोषिके देण्याचा पर्याय बदलापूर येथील एका लोकप्रतिनिधीने सुचविला असून त्याला यंदाच्या पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
कुळगांव-बदलापूर इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी मांडलेल्या या संकल्पनेतला शहरातील कात्रप आणि शिरगांव परिसरातील चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
सर्वसाधारणपणे सार्वजनिक मंडळे वर्गणीचा विनियोग सजावट अथवा मनोरंजनपर कार्यक्रमांसाठी करतात. त्यातून लोकमान्य टिळकांना अभिप्रेत प्रबोधन फारच कमी प्रमाणात होते. गणेशोत्सवासाठी लोकप्रतिनिधीेंकडून वर्गणी गोळा केली जाते. संभाजी शिंदेही दरवर्षी विविध मंडळांना वर्गणी देतात. यंदा मात्र त्यांनी वर्गणीऐवजी स्वच्छ, सुंदर सोसायटी स्पर्धेची संकल्पना मांडून त्यासाठी रोख रकमेची पारितोषिके प्रायोजित करण्याची तयारी दाखवली. त्यानुसार चार मंडळांनी आपापल्या विभागात अशी स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेत प्रामुख्याने सोसायटय़ांमधील घनकचरा व्यवस्थापन, सोसायटीच्या परिसरात करण्यात आलेली वृक्ष लागवड, सोसायटीअंतर्गत करण्यात येणारी स्वच्छता, वर्षभरात राबविलेले उपक्रम पारितोषिकांसाठी विचारात घेतले जाणार आहेत. पहिल्या तीन उत्कृष्ट सोसायटय़ांना अनुक्रमे अडीच हजार, दीड हजार आणि हजार रुपयांची बक्षिसे कुळगांव-बदलापूर इंजिनीअर्स असोसिएशनतर्फे दिली जाणार आहेत.