मान्यवर उद्योजकांचे मत  
पहिल्या दिवशीच्या तीनही सत्रांमध्ये महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाबाबत झालेला ऊहापोह, पहिल्याच सत्रात उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केलेले दमदार भाषण, उद्योजकांच्या लोकांकडून असलेल्या अपेक्षा यानंतर लोकसत्ता व सारस्वत बँक आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’च्या चौथ्या पर्वातील दुसरा दिवस असाच दणक्यात सुरू झाला. हॉटेल ताजमहल पॅलेसच्या रूफटॉपवर होणाऱ्या या कार्यक्रमात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी उद्योगविश्वातील अनेक नावाजलेले चेहरे एकत्र आले. महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाला वेगळी दिशा देण्याची क्षमता या कार्यक्रमात असल्याचे सर्व मान्यवरांचे म्हणणे होते.
‘लोकसत्ता’ व सारस्वत बँक आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’च्या ‘महाराष्ट्र : उद्योगाचे आव्हान’ या चौथ्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाने झाली. ‘आम्ही उद्योजिका’ या विषयावरील चर्चासत्रात महिला उद्योजिका, त्यांच्यासमोरील आव्हाने, त्यांनी मिळवलेले यश याबाबात मीनल मोहाडीकर, अदिती कोरे आणि कल्पना सरोज यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. शिवणकाम करणारी एक साधी मुलगी इथपासून आता ‘कमानी’सारख्या कंपनीच्या सर्वेसर्वा इथपर्यंतचा अत्यंत खडतर प्रवास मांडणाऱ्या कल्पना सरोज यांचा हा प्रवास ऐकून अनेक उपस्थित उद्योजकांनी त्यांच्या हिमतीला दाद दिली. अदिती कोरे यांनीही ३५ कोटींच्या छोटय़ा उद्योगातून ७५० कोटींपर्यंतची मजल आपण कशी मारली, याचे रहस्य उलगडून सांगितले. तर महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्या मीनल मोहाडीकर यांनी महिला उद्योजिकांसाठी उपलब्ध असलेल्या संधीबाबत आपली भूमिका मांडली.
या सत्रासाठी अनेक महिला उद्योजिका, उद्योजक आवर्जून उपस्थित होते. या तीनही उद्योजिकांच्या मनोगतानंतर प्रेक्षकांनीही महिला उद्योजिकांना मिळणारी संधी, त्यांच्यासाठी असलेली आव्हाने, पुरुषांच्या तुलनेत काही अधिक आव्हाने येतात का, असे अनेक प्रश्न विचारले. परदेशातील फार्मासाठीची बाजारपेठ आणि देशांतर्गत औषधांची बाजारपेठ यातील फरक अदिती कोरे यांनी अत्यंत सुलभ करून सांगितला. या सत्रानंतर झालेल्या चहापानादरम्यानही या तीनही महिला उद्योजकांना प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला.
दुसऱ्या सत्रात उद्योगविश्वासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा वित्तपुरवठय़ाबाबत मिलिंद कांबळे, पी. पी. पुणतांबेकर आणि वर्धन धारकर या तिघांनीही अत्यंत अभ्यासू विवेचन केले. छोटय़ा उद्योगधंद्यांना वित्तसाहाय्य देताना बँका करीत असलेला आडमुठेपणा, नव्यानव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात अर्थपुरवठय़ाचा मोठा वाटा यांबाबत या तिघांनीही आपले निरीक्षण नोंदवले. तसेच उद्योगधंद्यांना अधिक सोयीने आणि सुलभ वित्तपुरवठा कसा करता येईल, याबाबतही त्यांनी आपली मते मांडली.
हा विषय सर्वच उद्योजकांच्या जिव्हाळ्याचा असल्याने या चर्चासत्राच्या वेळी उद्योजकांनी अत्यंत लक्षपूर्वक सर्व माहिती कानात साठवण्याचा प्रयत्न केला. काही जण आपल्याजवळील नोटपॅडमध्ये टिपणेही काढत होते. प्रश्नोत्तराच्या काळातही लघु उद्योजकांसाठीचा वित्तपुरवठा, बँकांची भूमिका यांबाबत विविध प्रश्नांना या तज्ज्ञ उद्योजकांनी व वित्तपुरवठादारांनी अचूक उत्तरे दिली. हे सत्र काहीसे लांबले, तरीही प्रश्न संपत नव्हते. अखेर भोजनाच्या सत्रातही या वक्त्यांनी आपल्या परीने सर्वाच्या शंकांचे समाधान केले.
या परिषदेचे सहावे आणि शेवटचे सत्र अत्यंत महत्त्वाचे होते. ‘उद्योगाचे स्थलांतर- किती खरे, किती खोटे’ या विषयावरील परिसंवादासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार असल्याने सर्वच उद्योजकांमध्ये एक वेगळाच उत्साह होता. मुख्यमंत्री आपल्या समस्यांबाबत ठोस भूमिका घेतील, उद्योगविश्वाबाबत ठोस धोरण समोर ठेवतील, असा विश्वास प्रत्येक उद्योजकाला होता. अपेक्षेप्रमाणे हे चर्चासत्रही चांगलेच रंगले. महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाला एक चांगली दिशा आणि धोरण देण्याच्या मुद्दय़ावर ‘बदलता महाराष्ट्र’च्या चौथ्या पर्वाची सांगता झाली.