संतुलित आहार, योग व मॉर्निग वॉक यामुळे तणावापासून मुक्ती मिळते, असे मत आमदार डॉ. मिलिंद माने यांनी व्यक्त केले.
जरीपटका येथील जीकुमार आरोग्यधाम येथे ‘तणाव व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून जोधपूर येथील शिवप्रसाद अरोरा होते. थॅलेसेमिया सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी अध्यक्षस्थानी होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे नीता चौधरी व दीपक मोरयानी, रुग्णालयाचे संचालक डॉ. जी.एम. ममतानी, प्रामुख्याने उपस्थित होते. दुसऱ्यावर मानसिक आघात न करणे हेच, तणावरहित राहण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. जेवढे आम्हाला प्राप्त झाले, त्यातच संतुष्ट राहावे व जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटावा, असेही डॉ. माने म्हणाले. ‘तणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर प्रकाश टाकताना शिवप्रकाश अरोरा म्हणाले, तणाव निर्माण झाल्यास तो शरीरावर अनेक लक्षणाने दिसून येतो. त्यामध्ये अपचन, हृदयगती, उच्च रक्तचाप, लाळग्रंथीत निर्माण होणारे अडथळे, दमा, मधुमेह, पोटाचे विकार, चर्मरोग, अ‍ॅसिडिटी, अल्सर, अ‍ॅलर्जी, यांचा समावेश असतो. त्यामुळे तणावावर नियंत्रण करण्यासाठी स्वत:च प्रयत्न केले पाहिजे. सकारात्मक विचार, एखाद्या कामात गुंतवून घेणे, सकस आहार, योग, प्राणायाम, ध्यान व प्रार्थनेमुळे तणावातून मुक्ती मिळते. कोणताही तणाव न ठेवता अन्न ग्रहण करावे. अन्यथा मन तणावयुक्त बनते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नीती चौधरी यांनी सुदर्शनक्रियेमुळे तणावावर नियंत्रण मिळवता येत असल्याचे सांगितले. डॉ. विंकी रुघवानी यांनी तणावमुक्त कसे राहावे, याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अंजू ममतानी यांनी केले. डॉ. जी.एम. ममतानी यांनी आभार मानले.