महाराणा प्रताप जयंतीच्या कार्यक्रमासाठी दिलेल्या फेटय़ांचे बिल मागितले म्हणून व्यापारी पिता-पुत्राला बेदम मारहाण करून त्यांच्या ताब्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने लुटल्याप्रकरणी दहा तरुणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याउलट, व्यापारी पुता-पुत्राविरुद्धही मारहाण करून लूटमार केल्याची फिर्याद पोलिसांनी दाखल करून घेतली आहे. शहरातील मौलाली चौक ते सिद्धार्थ चौकादरम्यान आंध्र व्यायामशाळेजवळ हा प्रकार घडला.
पूर्व मंगळवार पेठेत क्षत्रिय गल्लीत राहणारे राजकुमार काशिनाथसा पवार (वय ५२) हे आपले पुत्र शिवराज पवार व कामगार विनायक ऊर्फ पप्पू जाधव असे तिघेजण मोटारकारमधून स्टार म्युझिकल पार्टीचे मालक देवीदास म्हेत्रे यांना हुबळी येथे कार्यक्रमास बोलावण्यासाठी जात असताना वाटेत आंध्र व्यायामशाळेजवळ प्रताप मनसावाले (रा. लोधी गल्ली, लष्कर) हा दिसला. प्रताप मनसावाले याने गेल्या वर्षी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त उधारीने फेटे खरेदी केले होते. त्याचे बिल मिळत नव्हते. पवार यांनी मनसावाले यास फेटय़ांचे बिल मागितले असता कसले बिल मागता, असे म्हणून त्याने पवार यांना शिवीगाळ केली. त्या वेळी शिवराज याने शिवीगाळ कशाला करता, असे विचारले असता त्यास मनसावाले व त्याचा साथीदार संतोष चव्हाण याने मारहाण केली. नंतर मनसावाले याचे अन्य साथीदारांनी तेथे धाव घेत पवार पिता-पुत्रास बेदम मारहाण केली. यात शिवराज याच्या डोक्यात तलवारीने वार करण्यात आला. हल्लेखोरांनी पवार पिता-पुत्राच्या ताब्यातील ९१ हजारांचे सोन्याचे दागिने बळजबरीने लुटून नेले.
याउलट, प्रताप मनसावाले यानेही पवार पिता-पुत्राविरुद्ध मारहाण केल्याची व सोन्याचे दागिने व रोकड आणि मोबाइल असा सुमारे ५५ हजारांचा ऐवज लुटल्याची फिर्याद सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.