‘लोक माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती मागवतात. त्यामुळे वाद निर्माण होतात. ते टाळण्यासाठी सर्व कागदपत्रे रद्दीत टाकावित ..’ हे अजब परिपत्रक आहे बेस्टचे. याच परिपत्रकाचा आधार घेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने एका प्रकरणाची चौकशीच बंद केल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. गिरगाव येथील निवासी जितेंद्र घाडगे यांनी बेस्टच्या मीटर जोडणी विरोधातील भ्रष्टाचाराची तक्रार लाचलुचपत विभागाकडे  केली होती. त्यावेळी बेस्टच्या या अजब परिपत्रकाच्या आधारे या तक्रारीची चौकशी बंद करण्यात आली होती. या परिपत्रकामुळे बेस्टच्या अजब कारभाराचा पुरावा समोर आला.
काय आहे परिपत्रक
बेस्टने २००८ साली हे परिपत्रक काढले आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाद निर्माण होतात. त्यामुळे सर्व विभागांनी मागील पाच वर्षांच्याच नोंदी ठेवून उर्वरित सर्व नोंदी भंगारात काढाव्यात, असे आदेश या परिपत्रकान्वये देण्यात आले आहेत. त्यानुसार २००३ पूर्वीच्या सर्व नोंदी ‘भंगारात’ काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे परिपत्रक बेस्टचे मुख्य अभियंते, विभागीय अभियंत्यांसह सर्व विभागांना पाठविण्यात आले आहे.
लाचलुचपत विभागाने अंग झटकले
 जितेंद्र घाडगे यांच्या जागेवर सुरेश ओझा या व्यक्तीच्या नावे वीज मीटर बसविण्यात आले होते. त्याविरोधात घाडगे यांनी बेस्टमध्ये २००७ साली तक्रार केली होती. ओझा यांना कुठल्या कागदपत्राच्या आधारे वीज मीटर जोडणी दिली त्याची माहिती त्यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविली होती. परंतु बेस्ट कागदपत्रे सापडत नाहीत, असे उत्तर देत होती. त्यामुळे घाडगे यांनी २००९ साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेच तक्रार दाखल केली. त्या प्रकरणाचीही चौकशी केली जात नव्हती. अखेर पाठपुरावा केल्यानंतर लाचलुचपत खात्याने २०१२ साली या प्रकरणाची चौकशी बंद करत असल्याचे घाडगे यांना कळवले. चौकशी का बंद केली याची माहिती मागविल्यावर लाचलुचपत खात्याने बेस्टचे हे परिपत्रक घाडगे यांना दिले. या परिपत्रकाच्या आधारे चौकशी बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
सरकारी कार्यालयातील कुठलाही कागद नष्ट करता येत नाही. तसे करायचे असल्यास मोठी प्रक्रिया असते. बेस्टने आपला गैरकारभार लपविण्यासाठीच अशाप्रकारे परिपत्रक काढले असल्याचा आरोप घाडगे यांनी केला. मुळात हे परिपत्रकच बेकायदा असून त्याचा आधार घेत लाचलुचपत खात्याने चौकशी बंद केली त्यामुळे त्यांचाही बेजबाबदारपणा दिसून येत असल्याचे घाडगे यांनी सांगितले.