शहरात वाहनधारकांना आपली वाहने उभी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ नसताना दुचाकी व चारचाकी वाहने ताब्यात घेण्याचे प्रकार महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून सुरू असून जोपर्यंत पुरेसे वाहनतळ निर्माण केले जात नाहीत, तोपर्यंत ही मोहीम रद्द करण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून करण्यात आली आहे.
ही मोहीम राबविताना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निवेदन भीमशक्तीतर्फे पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना देण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावा, वाहनधारकांशी कसे वागावे याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, वाहन ताब्यात घेताना काही नुकसान झाल्यास नुकसानग्रस्तास त्वरित भरपाई देणे आवश्यक आहे. मेनरोड, महात्मा गांधी रोड, रविवार कारंजा, सीबीएस या भागांत प्रचंड गर्दी असते. आपले वाहन कुठे उभे करावे, असा प्रश्न कोणालाही पडतो. पोलीस आयुक्त व पालिका आयुक्त यांनी गर्दीच्या ठिकाणी असलेले खासगी वाहनतळ सर्वासाठी उपलब्ध करून द्यावेत, ज्या दुकान मालकांनी वाहनतळाच्या जागेवर बांधकाम केल्यामुळे ग्राहकांना रस्त्यावर वाहने उभी करावी लागतात, अशा दुकानदारांविरुद्ध कारवाई करावी. गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालक मनमानी करून रिक्षा उभ्या करतात.
व्यापाऱ्यांची वाहने उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. आयुक्तांनी सर्वप्रथम शहरात ठिकठिकाणी वाहनतळ, टपरी विभाग निर्माण करून रस्त्यात अडथळा आणणारे फेरीवाले, गाडीवाले व रिक्षावाले यांची व्यवस्था करावी, त्यानंतरच त्यांनी अस्ताव्यस्तपणे रस्त्यात उभ्या राहणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हेतू कितीही चांगला असला तरी वाहने ताब्यात घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काही वेळा आगळीक घडते. त्यामुळे वाहनधारक आणि वाहतूक पोलीस यांच्यात वाहन ताब्यात घेतल्यानंतर सतत वादविवाद सुरू असतो. दुकानदारांच्या मालकीची वाहने तसेच दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्या वाहनांकरिता पोलिसांकडून स्टीकर देण्यात यावेत, असे भीमशक्ती सामाजिक संघटनेने निवेदनात म्हटले आहे.