आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सायकल चालविणे उपयुक्त आहे. याबाबत विदर्भात विविध पर्यावरण आणि आरोग्य संघटनांतर्फे जनजागृती केली जात आहे. मात्र, भाडय़ाने का होईना पण सायकल आता सहज उपलब्ध होत नसल्याने सामान्यांना या मोहिमेला हातभार लावणे कठीण जात आहे. सायकल भाडय़ाने घेऊन वापरणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटल्याने हा व्यवसायच विदर्भात आता शेवटच्या घटका मोजत आहे. या संकटाची पावले वेळीच ओळखून काही जणांनी पोटापाण्यासाठी आता अन्य व्यवसायाचा आश्रय घेतला आहे.
पूर्वी घरोघरी दुचाकी आणि चारचाकी वाहने नव्हती. सायकल मात्र हमखास दिसत असे. गरीब लोकांची सायकल विकत घेण्याची परिस्थिती नसल्याने ते भाडय़ाने सायकल घेऊन कामे करीत होते. सायकल शिकायची असेल तर भाडय़ाने सायकल घेऊन शिका असे सांगितले जायचे त्यामुळे भाडय़ाने मिळणाऱ्या सायकलला मोठय़ा प्रमाणात मागणी होती. शहरातील बडकस चौक, एस.टी. स्टंॅड, इतवारी, पाचपावली, महाल, नंदनवन या भागात अनेकांनी भाडय़ाने सायकल देण्यासाठी दुकाने थाटली होती. प्रत्येकाजवळ किमान १०० ते १५० सायकली होत्या, त्यासाठी ते प्रतितास ५० पैसे ते २ रुपये या प्रमाणे शुल्क आकारले जात असे. सायकल भाडय़ाने देण्याचा व्यवसाय लहान-मोठी गावे आणि शहरात काही वर्षांपूर्वी मोठय़ा प्रमाणावर चालायचा. शहराच्या विविध भागात पूर्वी अशी २०-२५ दुकाने होती. तासाला ५० पैसे या दराने सायकल वापरायला मिळायची. त्यानंतर हा दर एक-दोन रुपयांवर पोहोचला होता. संपूर्ण दिवसासाठी म्हणजे २४ तासांचे भाडे ८ते ९ रुपये होते. केवळ रात्री सायकल हवी असेल तर तशीही सोय होती. एका रात्रीसाठी केवळ सहा रुपये आकारले जायचे.
पूर्वी मोजक्या लोकांकडे स्वत:ची सायकल होती. मोटरसायकल तर बोटावर मोजता येईल एवढय़ा कमी होत्या. स्वत:ची सायकल असणे एकेकाळी प्रतिष्ठेचे समजले जायचे. सरकारी कर्मचारी व सधन शेतकऱ्यांकडेच तेव्हा सायकल दिसायची. सालगडय़ांना तेव्हा पायी किंवा बैलगाडीत बसून शेतावर जावे लागायचे. मालकाला मात्र शेतात येण्यासाठी सायकल असायची. शहरातील तसेच जवळपासच्या गावातील कामांसाठी सर्वसामान्य लोक भाडय़ाच्या सायकलचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग करायचे. अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून तेव्हा सायकल, टॅक्सीचा व्यवसाय सुरू केला होता. एसटी बसस्थानकावर उतरले की भाडय़ाने सायकल घेऊन शहरात काम केले जात असे. सायकल व्यावसायिकांनी नागरिकांना पुरविलेली विशेष सेवा म्हणजे ‘रेल्वे स्टेशनला सोडता येणारी सायकल’. तेव्हा शहरात प्रवाशांच्या शहर वाहतुकीसाठी सायकल रिक्षा नाहीशा झाल्या. काही सायकल रिक्षा दिसतात. परंतु त्यांचा वापर प्रवासी वाहतुकीऐवजी मालवाहतुकीसाठी केला जातो. रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी तेव्हा सायकल रिक्षाचे भाडे एका प्रवाशासाठी तीन-चार रुपये होते. परंतु भाडय़ाची सायकल स्टेशनवर सोडण्यासाठी केवळ एक रुपया आकारला जायचा. भाडय़ाच्या सायकलचा उपयोग तेव्हा सर्वसामान्यांना मोठय़ा प्रमाणावर व्हायचा. मात्र गेल्या दहा ते बारा वर्षांत घरोघरी मोटारसायकल आणि चारचाकी वाहने आल्याने सायकलची मागणी कमी झाली. घरोघरी मुलांकडे सायकली आल्या. त्यामुळे भाडय़ाने सायकल देण्याचा व्यवसाय डबघाईला आला आहे. आज शहरातील विविध भागात किरायाने सायकल देणारी दुकाने बंद झाली असून त्यांनी दुसरा व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय आता डबघाईला आला आहे.
 भाडय़ाने सायकल देण्याच्या व्यवसायात पूर्वी असलेले सुनील अग्रवाल म्हणाले, टायर-टय़ूबसह सायकलच्या सुटय़ा भागांच्या किमतीत पूर्वीच्या तुलनेत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. सायकलच्या किमतीही वाढल्या आहेत. ज्यांच्याकडे पूर्वी सायकल होती, त्यांच्याकडे आता मोटरसायकल आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांला सुद्धा त्यांच्या पालकांनी सायकल घेऊन दिल्या आहेत. सायकल बंद करून मोटारसायकल घेऊन दिल्या आहेत. आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सायकल चालविणे आवश्यक असल्याचा प्रचार केला जात असला तरी आज सायकल भाडय़ाने मिळत नाही. ज्यांच्याकडे घरी सायकल आहे त्या पुन्हा बाहेर निघू लागल्या आहेत. शिवाय शहरात रिक्षाचे आगमन झाल्यानेही सायकलच्या वापरावर मर्यादा आली असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.