शहराच्या मध्यवर्ती भागात आणि जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित डी. डी. बिटको बॉईज हायस्कूल, यशोदामाता बिटको गर्ल्स हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही यंत्रणा आणि शालेय व्यवस्थापनची करडी नजर असे तिहेरी कडे असले तरी संस्थेचे सुरक्षाकवच समाजकंटकाकडून सहज भेदण्याचे प्रकार घडले आहेत. परिणामी विद्यालयाच्या आवारात वाद-विवाद, कुरापतीचे प्रसंग ओढवले आहेत. शालेय व्यवस्थापनाकडून याबाबत कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला जात असतांना यावर नियंत्रणासाठी पोलिसांचे सहकार्य अपेक्षित आहे.
दोन्ही शाळांमध्ये दोन सत्रात पाच हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे मुख्य प्रवेशद्वार जुना मुंबई आग्रा रस्त्यालगत आहे. या परिसरात सतत विविध आंदोलने, निदर्शने सुरू असतात. त्याचा विद्यालयास त्रास होतो. आंदोलनकर्ते, परगावाहून येणाऱ्या व्यक्ती, आपली वाहने विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभी करतात. प्रवेशव्दाराजवळील परिसरास हातगाडीवाल्यांचाही कायम वेढा असतो. विद्यालय सुटतांना व भरतांना होणारी विद्यार्थ्यांची गर्दी विविध मार्गाने नियंत्रित व्हावी यासाठी स्टेडियमच्या बाजूने असलेली विद्यालयाची दोन प्रवेशद्वारे खुले करण्याची मागणी प्रशासनाकडे होत आहे. मात्र जिल्हा परिषदेशी असलेल्या वादामुळे या विषय अंमलात येण्यास अडचणी आहेत. गर्दीचा फायदा घेत बाहेरील टारगट मुले शाळेच्या आवारात शिरून विद्यार्थ्यांना त्रास देतात.
मुख्य प्रवेशद्वारालगत बस थांब्याची निर्मिती करण्यात आली आहे. शेजारीच गृहरक्षक दलाचे कार्यालय आहे. विद्यालय सुटतांना तसेच भरतांना या बस थांब्यावर टारगट मुले उभी राहतात. विद्यार्थिनींवर शेरेबाजी करणे, कधी कधी रस्त्यात त्यांची अडवणूक करणे, असे प्रकार त्यांच्याकडून केले जातात. या पाश्र्वभूमीवर व्यवस्थापनाच्या वतीने संस्थेच्या संपूर्ण आवारात २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे बाहेरून येणारी अनोळख्या व्यक्तीची माहिती मिळते. आवारातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या गैर प्रकारांवर त्यामुळे नियंत्रण आले आहे. याशिवाय मुख्य प्रवेशद्वारावर एका माजी सैनिकाची सुरक्षा रक्षक म्हणून शालेय वेळेत नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा पगार पालक-शिक्षक संघाच्या निधीतून करण्यात येतो. बाहेरून आलेल्या व्यक्तीने जर काही आक्षेपार्ह कृत्य केले तर त्याला सरळ पोलिसांच्या स्वाधीन केले जाते. आजवर २२ जणांवर अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे.
विद्यालयाने बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारची वाहन उभे करण्याची व्यवस्था केलेली नाही. विद्यालयालगत पदपथांवर अतिक्रमण केलेल्या वाहनांचा त्रास होतो. या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते.
शिवाय विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास अडथळा होत असल्यामुळे गर्दी होते.
याबाबत प्रादेशिक परीवहन विभाग तसेच पोलिसांचे सहकार्य व्यवस्थापनाला अपेक्षित आहे. शाळेत सध्या अग्निशमनच्या चार नळकांडय़ा आहेत. नजीकच्या काळात ही संख्या वाढविण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.
मुले बेपत्ता होणे, विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न असे प्रकार गेल्या काही दिवसांत घडत असल्याने पोलीस यंत्रणेने शालेय व्यवस्थापनास विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिने दक्ष राहण्याची सूचना केली आहे. या घटनांमुळे पालक वर्गात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेची स्थिती नेमकी काय आहे, याचा घेतलेला हा वेध.