08 March 2021

News Flash

पदवीधर मतदारसंघात भाजपचा उमेदवार गुलदस्त्यात, कार्यकर्ते संभ्रमात

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व बहुजन समाज पक्षाचा उमेदवार निश्चित झाला असून भारतीय जनता पक्षातर्फे वेगवेगळी नावे

| November 29, 2013 10:03 am

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व बहुजन समाज पक्षाचा उमेदवार निश्चित झाला असून भारतीय जनता पक्षातर्फे  वेगवेगळी नावे समोर येऊ लागल्याने भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांचा नेमका वारसदार कोण राहील, याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून नाव जाहीर करण्याबाबत नेमके अडले कुठे, याबाबत कार्यकर्ते चर्चा करू लागले आले. महापौर अनिल सोले यांच्या नावाची चर्चा असताना संदीप जोशी, प्रा. संजय भेंडे, डॉ. विलास डांगरे आणि गिरीश व्यास यांचीही नावे समोर येत असल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी सलग चारवेळा निवडून आल्यामुळे सर्वपरिचित झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची येती निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जो कोणी उमेदवार देण्यात येणार आहे तो सक्षम असावा असे यापूर्वीच विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी उपराजधानीत काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दिल्लीवरून आठ दिवसात नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले होते, मात्र त्या बैठकीला पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी झाल्याने अजूनही नावे जाहीर करण्यात न आल्यामुळे पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पूर्ण तयारी झाली असल्याचा दावा भाजपतर्फे केला जात असून केवळ उमेदवाराचे नाव घोषित होण्याची कार्यकर्ते वाट पहात आहेत.
काँग्रेसने प्राचार्य बबनराव तायवाडे यांची उमेदवारी आधीच जाहीर केली आहे. बहुजन समाज पक्षाने प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीचा उमेदवार या निवडणुकीत देण्याचा पक्षाचा प्रयत्न असला तरी सध्या एकमत होत नाही. दरम्यान, बहुजन समाजामधून उमेदवार द्यावा, असा आग्रह होत असल्यामुळे प्रा. संजय भेंडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. इच्छुकांना तर भेंडे यांच्यासाठी काम सुरू करा, असे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भेंडे यांना उमेदवारी दिली तर भाजपमधील एक गट नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास नाव जाहीर करण्याचे टाळले जात आहे. संदीप जोशी यांना निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली असून गेल्या पाच सहा महिन्यापासून पदवीधर मतदारसंघासाठी ते मेहनत घेत आहेत. पक्षाने संधी दिली तर जोशी सुद्धा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. गिरीश व्यास यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य नागपुरातून उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करून पक्षातून बाहेर पडण्याची तयारी केली होती, मात्र वरिष्ठांच्या आश्वासनामुळे त्यांची नाराजी दूर झाली होती. पदवीधर मतदारसंघासाठी त्यांचे नाव घेतले जात आहे मात्र त्यांची शाश्वती कमी आहे.
भाजपने अद्याप आपला उमेदवार का जाहीर केला नाही याचे अनेकांना कोडे पडले आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते संभ्रमात आहे. उमेदवार नितीन गडकरी यांच्या पसंतीचाच राहील हे तर पुरेसे सुस्पष्ट असले तरी ‘तो कोण’ या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे. गडकरींनी आपला पत्ता राखून ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आपला उत्तराधिकारी ते ‘विचारपूर्वक’ निवडणार असल्याचे यातून दिसून येत आहे. प्रारंभी अनिल सोले यांच्या नावाची चर्चा असली तरी बहुजन समाजाला नेतृत्व देणे ही काळाची गरज असल्याचा विचार पक्षामध्ये सुरू आहे. त्यादृष्टीने प्रा. संजय भेंडे यांचे नाव आघाडीवर आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे असल्यामुळे तेथील प्रचार रणधुमाळीत ते व्यस्त आहेत. त्यामुळे दिल्लीची निवडणूक होईपर्यंत तरी पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवाराचे नाव जाहीर होणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत कार्यकर्त्यांंना वाट पहावी लागणार आहे, हे निश्चित.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 10:03 am

Web Title: bjp candidate not declared for graduate constituency
Next Stories
1 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची बुथनिहाय प्रचारयंत्रणा सज्ज
2 पदवीदान समारंभ, २५० महाविद्यालयांचा प्रश्न आणि वकिलाची अकार्यक्षमता गाजली
3 विशेष कार्यकारी अधिकारीपदाला बारावी नापास नगरसेवक मुकणार
Just Now!
X