राज्यात गेली २५ वर्षे असलेली शिवसेना-भाजप युती तुटल्याने नवी मुंबईतील एका मतदारसंघात मोठी पंचाईत निर्माण झाली असून कोणी चांगला उमेदवार देता का उमेदवार.. अशी स्थिती भाजपची झाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या माजी आमदार मंदा म्हात्रे यांच्यासारखा एखादा तंगडा उमेदवार ऐरोलीसाठी हाती लागतो का याची चाचपणी भाजप गोटात सध्या सुरू आहे. म्हात्रे यांना बेलापूर देण्यात आले आहे.
नवी मुंबईत भाजपची स्थिती कडीपत्त्यासारखी आहे. राज्यात युती असल्याने शिवसेनेला मदत करणे इतकेच काम भाजपचे इतकी वर्षे होते. त्यामुळे स्वबळावर निवडून आलेला भाजपचा एक नगरसवेक पालिकेत आहे. वीस वर्षांत भाजपला पालिकेत जम बसविता आलेला नाही. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक नेत्यांचे निकटवर्तीय बिल्डर सुरेश हावरे यांनी प्रतिष्ठा करून बेलापूर विधानसभेसाठी उमेदवारी खेचून आणली. शिवसेनेच्या जोरावर त्यांना चांगली मतेदेखील मिळाली, पण त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा तेव्हाही नव्हता आणि आताही नाही. राष्ट्रवादीच्या ‘दादांना’ कंटाळून मंदा म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकून काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामागे राष्ट्रवादीतील जाच कारणीभूत असला तरी भाजपच्या वाटय़ाला असलेला बेलापूर मतदारसंघ मिळावा हा उद्देश लपून राहिला नव्हता. हावरे यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याने म्हात्रे यांनी तो दावा केला आहे. त्यामुळे युती तुटल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना हा मतदारसंघ भाजपकडे मागणार होती. त्या बदल्यात गुहागर देण्याचे ठरले होते. या मतदारसंघासाठी शिवसेने पाच जणांच्या मुलाखती देखील घेतलेल्या आहेत. त्यातील एकाला उमेदवारी दिली जाणार आहे. त्यासाठी उमेदवार आयात करण्याची शक्यता आहे. बेलापूरमधील उमेदवारांचा हा तिढा सुटला असला तरी नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघात भाजपकडे उमेदवारच नाही. या मतदारसंघाची उमेदवारी मिळावी यासाठी एकाही भाजप कार्यकत्याने मागणी केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे संदीप नाईक व शिवसेनेचे विजय चौगुले किंवा वैभव नाईक यांच्या समोर उभा राहणारा उमेदवार नाही. त्यामुळे भाजपला ऐन वेळी दुसऱ्या पक्षातील नाराज उमेदवार शोधावा लागत आहे.