भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर होताच धरमपेठेतील निवासस्थान आणि पक्षाच्या कार्यालयासमोर ढोल ताशांच्या निनादात फटाक्याची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गेल्या चार-पाच दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यपदी कोण राहील याची चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर होते, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गुढीपाडव्याच्या महुर्तावर गुरुवारी दुपारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनी नवी दिल्लीत प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करताच उपराजधानीतील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोश केला.  टिळक पुतळा आणि धंतोलीतील भाजपच्या विभागीय कार्यालय परिसरातही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
धरमपेठेतील फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाक्याची आतषबाजी करीत दिवाळी साजरी केली. गुढीपाडव्यानिमित्त शहरातील विविध कार्यक्रमात उपस्थित असताना देवेंद्र फडणवीस यांचा मोबाईल सारखा खणखणत होता.
शिवाय कार्यक्रमात प्रत्यक्ष अभिनंदन करणाऱ्यांची संख्या मोठी होती. शिक्षक सहकारी बँकेच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नव्हती, मात्र अनेकांनी देवेंद्रचे अभिनंदन केले. दुपारनंतर देवेंद्रच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांची गर्दी वाढत असताना त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची रांग लागली होती. निवासस्थानासमोर जल्लोष सुरू असताना देवेंद्र फडणवीस दुपारी दोनच्या सुमारास आशीर्वाद घेण्यासाठी पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आले. यावेळी कांचन गडकरी यांनी औक्षण केल्यावर जवळपास २० मिनिटे गडकरी यांच्याशी चर्चा केली. यानंतर सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली.
तसेच रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजीच्या समाधीचे दर्शन घेतले.