लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी इच्छुकांनी कंबर कसली असून, त्याचे प्रत्यंतर बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी १२५ हून अधिक जणांच्या मुलाखतीद्वारे आले. काहींनी थेट दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू केले असले, तरी प्राथमिक स्तरावर भाजपच्यावतीने उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. येथील शुभमंगल कार्यालयात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात बुधवारी शक्तिप्रदर्शन करत इच्छुकांनी मुलाखती देताना स्वबळावर लढण्याची मागणी कायम ठेवली.
येथील शुभमंगल कार्यालयात नाशिक शहराव्यतिरिक्त जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती आ. चंद्रकांत पाटील व आ. माधुरी मिसाळ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, संघटनमंत्री विठ्ठलराव साठे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. मेळाव्याच्या सुरुवातीला विधानसभा कार्यकारिणीशी चर्चा करत इच्छुकांच्या मुलाखतीस प्रारंभ झाला. बंद दाराआड झालेल्या मुलाखतीत उमेदवारांची व्यूहरचना काय असेल, पक्षाला ग्रामीण भागात प्रतिसाद कसा, कोणत्या मुद्दय़ावर भर द्यायचा, यावर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश पाहता अन्य राजकीय पक्षातील मंडळींनी विधानसभेसाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नाशिक ग्रामीणमधून अनेक दिग्गज पक्ष प्रवेशास इच्छुक असले, तरी यापैकी एकानेही मुलाखतीला हजेरी लावली नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान भाजपचे वर्चस्व असलेल्या चांदवड, सटाणा आणि बागलाण मतदारसंघातून इच्छुकांची संख्या सर्वाधिक होती.
बागलाणमधून २२ इच्छुक उमेदवार असून विद्यमान आमदार उमाजी बोरसे यांच्यासह माजी आमदार दिलीप बोरसे, शंकरराव आहिरे यांच्यासह नवोदित निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. चांदवड येथील भूषण कासलीवाल यांनी शक्तिप्रदर्शन करत हजेरी लावली.
या मतदारसंघात १६ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. इतर राजकीय मंडळी इच्छुक असून त्यांच्यासाठी दूरध्वनी खणखणत होते. मालेगाव मध्य हा मुस्लिमबहुल भाग असल्याने या ठिकाणी केवळ तीन उमेदवारांनी मुलाखती दिल्या. ११ विधानसभा मतदारसंघात एकूण १२५ उमेदवारांनी मुलाखत देत निवडून येण्याचा दावा केला. निफाड, चांदवड या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत स्वबळावर लढण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. दुपारच्या सत्रात नाशिक शहर परिसरातील चार विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. शहरातही सर्वच विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे.
नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी असे सारेच विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचे पाहावयास मिळाले. सायंकाळी उशिरापर्यंत मुलाखतीची प्रक्रिया सुरू असल्याने इच्छुकांचा
आकडा आणखी वाढणार आहे. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, प्रदेश सरचिटणीस सीमा हिरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.