कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटल सेंटरमधील मैदानात एका आयुधाचे सराव प्रात्यक्षिक सुरू असताना भीषण स्फोट होऊन एक जवान शहीद झाला. या घटनेत पाच जवान जखमी झाले असून त्यांना तेथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
कामठीचा लष्करी तळ भारतीय सैन्य दलातील महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. युद्धकला, प्रशासन तसेच विविध आयुधांच्या वापरांचे येथे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हे केंद्र अत्यंत संवेदनशील असून तेथे लष्करी जवानांशिवाय इतर कुणालाही प्रवेश दिला जात नाही. येथील प्रत्येक बाबी गोपनीय राखल्या जातात. त्यामुळे काल घडलेल्या घटनेबाबत अत्यंत गोपनीयता राखली जात असून लष्कर अथवा संरक्षण खात्याकडून चोवीस तास होऊनही अधिकृत माहिती दिली गेली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, येथे प्रशिक्षण घेत असलेल्या जवानांचे आयुध वापरासंबंधी सराव प्रात्यक्षिक सुरू होते. मिसाईलसदृश आयुध एका टाकीत टाकण्यात आले. त्यातील इंधनाचा वातावरणातील उष्णतेने स्फोट झाला.
स्फोटाच्या आवाजाने हा परिसर हादरला. आयुधाच्या सराव प्रात्यक्षिकाप्रसंगी येथील वरिष्ठ अधिकारी तसेच इतर जवानही हजर होते. स्फोटात एक जवान शहीद झाला. त्याच्या छातीत एक मोठा लोखंडी दांडा घुसला. त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. पाच जवानांच्या डोळ्यात रासायनिक धूर गेला. घटना घडल्यानंतर अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. जखमींना लगेचच तेथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली. काल रात्री केवळ कामठीचे पोलीस निरीक्षक संजय जोगदंड यांना आत प्रवेश देण्यात आला. आज सकाळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखडे यांना आत जाऊ देण्यात आले. या घटनेप्रकरणी कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. लष्कराच्या मुख्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली. या घटनेच्या लष्करी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हैदराबाद येथून लष्कराचे तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे पथक नागपुरात आले. स्फोट कसा झाला, त्यामागील कारणे कोणती आदी तपास या पथकाने दिवसभर केला.