आपल्या ७८ धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब करणाऱ्या महापालिकेने फुले मंडईजवळील शिवाजी मंडईवर मात्र मेहरनजर केली आहे. शिवाजी मंडईची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल सल्लागाराने दिल्यानंतर ती रिकामी करणे अपेक्षित होते. पण आजही या इमारतीत अनेक कार्यालये सुरू आहेत.
शिवाजी मंडई घाऊक मासळी बाजारासाठी प्रसिद्ध आहे. मोडकळीस आलेली ही चार मजली इमारत सध्या टेकूंवर उभी आहे. काही महिन्यांपूर्वी स्लॅबचा काही भाग कोसळून एक कामगार दगावला होता. धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पालिकेने मुंबईतील ३० वर्षे जुन्या इमारतींचे संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी सल्लागार म्हणून अशोक मेहंदळे यांची पालिकेने नियुक्ती केली. शिवाजी मंडईची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल मेहेंदळे यांनी दोन महिन्यांपूर्वीच पालिकेला सादर केला आहे. शिवाजी मंडईचा चौथा मजला अतिधोकादायक असल्याचे अहवालात म्हटले होते. पालिकेने चौथ्या मजल्यावरील छज्जाचा भाग तोडून टाकत कारवाई आटोपती घेतली.
अजूनही घनकचरा व्यवस्थापन, परवाना, जकात, कीटकनाशक आदी विभागांची कार्यालये याच इमारतीमध्ये आहेत. तळमजल्यावरील घाऊक आणि किरकोळ मासळी बाजरही सुरू आहे. पहाटेपासून या मासळीबाजारात विक्रेते आणि खरेदीदारांची प्रचंड वर्दळ असते. ही धोकादायक इमारत कोसळली तर मोठय़ा प्रमाणावर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही ही इमारत रिकामी करण्यास प्रशासन कानाडोळा करीत आहे.
पालिका आपले कर्मचारी राहात असलेल्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती रिकाम्या करण्यासाठी हाती दंडाही घेण्यास मागेपुढे पाहात नाही. त्याच वेळी थेट पालिकेच्या ताब्यातील मंडईच्या इमारतीकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करीत आहे.