गाव नकाशा दुरुस्तीच्या कामासाठी पन्नास हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पनवेल येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार आणि भू करमापक अधिकाऱ्याविरोधात नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी ठेकेदाराकडून तीस हजारांची लाच स्वीकारताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांना अटक करण्यात आली होती. नगर परिषदेमधील भ्रष्टाचार यानिमित्ताने समोर आला होता. सोमवारी पनवेल पोलीस ठाण्यात उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार मधुकर सुदाम अहिरे आणि भू करमापक अधिकारी राजेंद्र चंद्रभान देवरे यांच्याविरोधात पन्नास हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जमिनीचे कागद पडताळणीकरिता आलेल्या एका इस्टेट एजंटकडून गाव नकाशा दुरुस्तीच्या कामासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.  तक्रारीवरून विभागाने भूमी अभिलेख कार्यालयाजवळ सापळा लावला होता. मात्र अहिरे आणि देवरे यांना याची भनक लागल्याने सापळा फसला. अखेर अहिरे, देवरे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.