एकत्र राहू न शकणारे भाऊ जनतेला काय न्याय देणार, अशी टीका भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी येथे आयोजित प्रचार सभेत राज व उद्धव या ठाकरे बंधूंवर नाव न घेता केली. अहंकाराने राजकारण करता येत नाही. नम्रता आणि शालीनता हे गुण राजकारणासाठी आवश्यक असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.
येथील शनि पटांगणात आयोजित सभेत उमा भारती यांनी शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वावर टीकास्त्र सोडले. आघाडी सरकारने भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जनतेला मूलभूत गरजाही मिळेनासे झाले आहे. भाजप नदीजोड प्रकल्प राबविणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले. सेना-भाजप युती तुटल्याचे दु:ख आपणासही आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपणांस वडिलांसमान होते. त्यांचे आशीर्वाद आपण घेतले असून आजही त्यांच्याविषयी आदर आहे. परंतु त्यांच्या घरातील भाऊ एकसंध राहू शकत नाहीत. ते जनतेला काय न्याय देणार, असा प्रश्न उमा भारती यांनी केला. आपापसातील राग आमच्यावर काढू नये, असेही त्यांनी सुनावले.