महापालिका क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू करण्याच्या विरोधात व्यापारी पुन्हा एकवटले आहेत. दि. १ ते १० डिसेंबर दरम्यान दुपारी एकपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. व्यापारी महासंघाने एलबीटीसंबंधी आपला रोष सातत्याने प्रकट केला आहे. दि. १ नोव्हेंबरपासून महापालिकेने एलबीटीची वसुली सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनीही आता त्या विरोधात कंबर कसली आहे. दि. ३१ मार्चपर्यंत एलबीटीला स्थगिती देण्यात येत असल्याचे सांगितले असले, तरी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. महापालिकेच्या भूमिकेला व्यापारी कडाडून विरोध करणार असून सर्व मार्गाने आपला विरोध ते कायम नोंदवत राहतील, असे व्यापारी संघाचे अध्यक्ष बसवराज वळसंगे व सचिव दिनेश गिल्डा यांनी पत्रकात म्हटले आहे.