News Flash

घरखरेदीलाही ‘फ्री’चा टेकू!

दोन शर्ट घेतले तर तीन मोफत, किंवा प्रेशर कुकरवर पातेले फ्री अशा जाहिरातील तुमच्याआमच्या परिचयाच्या आहेत. किंबहुना असे काही ‘फ्री’ मिळाल्याशिवाय हल्ली खरेदी होतच नाही.

| September 13, 2013 12:21 pm

दोन शर्ट घेतले तर तीन मोफत, किंवा प्रेशर कुकरवर पातेले फ्री अशा जाहिरातील तुमच्याआमच्या परिचयाच्या आहेत. किंबहुना असे काही ‘फ्री’ मिळाल्याशिवाय हल्ली खरेदी होतच नाही. ही ‘फ्री’ची लाट आता घरखरेदीच्या क्षेत्रातही आली आहे. २ बीएचके घर घेतले तर पार्किग फुकट, १ बीएचके घरावर ५० ग्रॅम सोने मोफत.. अगदी चाळीतील घर घेत असलात तरी काहीतरी फुकट मिळेलच.. गेल्या काही दिवसांत मुंबई आणि आसपासच्या घरखरेदीला हा ‘फ्री’चा टेकू लागला आहे.
अन्य अनेक क्षेत्रांप्रमाणेच रिअल इस्टेट क्षेत्रालाही सध्या मंदीने ग्रासले आहे. या मंदीतून बाहेर पडण्यासाठी, किमानपक्षी तयार घरे किंवा बांधकाम सुरू असलेल्या इमारतींमधील घरे तरी विकली जावीत यासाठी घर खरेदी करणाऱ्यांना नानाविध प्रलोभने दाखविली जात आहेत. यात सोने, पार्किंग, पहिल्या वर्षांचे भाडे माफ अशा अनेक बाबींचा समावेश आहे.
गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत ग्राहकांना सदनिका खरेदीकडे आकर्षित करण्यासाठी विकासकांनी विविध सुविधांचा हा खजिना खुला केला आहे. गणेशोत्सवासारख्या मंगलमयी आणि पवित्र काळात खरेदी करण्याकडे लोकांचा कल अधिक असतो. तेच हेरून ग्राहकांना सदनिका खरेदीकडे वळविण्यासाठी विकासकांनी हा मुहूर्त साधला ग्राहकांसाठी विविध सवलती उपलब्ध करून दिल्याचे ‘मंत्री रिअ‍ॅल्टी’च्या विपणन प्रमुख रचना राज सेठी यांनी सांगितले. कंपनीने गोरेगाव येथे १८ मजली इमारत उभी केली असून त्यातील सदनिका खरेदीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध आणि आकर्षक विपणन क्लृप्त्या वापरल्या आहेत. कंपनीने वनबीएचके, टुबीएचके, थ्रीबीएचके आणि डय़ुप्लेक्स सदनिका खरेदीवर १०० गॅ्रम सोने देण्याची तयारी दाखवली आहे. दुसरीकडे काही विकासक तर सदनिकेमध्ये तयार स्वयंपाकघर, वातानुकूलित संच उपलब्ध करून देत आहेत.
विकासकांकडून सध्या देण्यात येत असलेल्या या सवलती खरेदीदाराचे वेतन आणि घरांच्या किंमती हे ध्यानात ठेवून दिल्या जात आहेत, असे एका रिअल इस्टेट दलालाने सांगितले. जमिनीच्या वा मालमत्तेच्या किंमती कमी होऊ नयेत याकरिता सवलतीच्या जाहिराती देण्यास बरेचशे विकासक उत्सुक नसल्याकडेही या दलालाने लक्ष वेधले.
‘नाईट फ्रॅन्क’ या रिअल इस्टेटमधील सल्लागार कंपनीच्या अहवालानुसार, रिअल इस्टेटच्या क्षेत्रात मुंबई हे न परवडण्यासारखे शहर बनले आहे. शहरातील विक्रीयोग्य सदनिकांपैकी तब्बल २९ टक्के सदनिका ‘प्रीमियर’ वर्गात मोडतात. अर्थात त्यांची किंमत प्रत्येकी १ कोटींहून अधिक आहे. स्वाभाविकच सर्वसामान्यांच्या आवाक्यात उरलेली अवघी ७१ टक्केच घरे येतात. याउलट ‘राष्ट्रीय राजधानी परिसरा’त (एनसीआर) हे प्रमाण ११ टक्के आणि बंगळुरुमध्ये तर अवघे ५ टक्के आहे.
सध्या लोढा ग्रुप, ओमकार रियाल्टर अ‍ॅण्ड डेव्हलपर्स आणि के रहेजा कॉर्पोरेशनसारख्या बडय़ा विकासकांनीही निवासी अपार्टमेंटसह
‘रिअल इस्टेट रिसर्च अ‍ॅण्ड रेटिंग फर्म लियोसेस फोरास फील्स’च्या पंकज कपूर यांच्या मते किंमती थेट कमी करण्याऐवजी ग्राहकांना सवलतींचा खजिना खुला करून सदनिका खरेदीकडे वळविले जात आहे. एकेकाळी गगनाला भिडणाऱ्या किंमतीला सदनिका विकणारे विकासक आता कमी दरात सदनिका उपलब्ध करून देण्याचा मार्ग अवलंबित असल्याचेही कपूर यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2013 12:21 pm

Web Title: buy a flat get gold coins air conditioners for free
टॅग : Flat
Next Stories
1 समाजभान जपणारा ‘मुंबईचा राजा’
2 ‘म्हाडा’च्या घराचीही ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’!
3 मुंबईच्या किनाऱ्याला ‘स्टिंग रे’, ‘जेली फिश’ नवखे नाहीत!
Just Now!
X