वाहतूक नियमांचे पालन करण्याबरोबरच वाहनांची योग्य देखभाल आणि साडय़ांचे पदर, ओढणी यांची योग्य काळजी घेणे, बेल्ट, हेल्मेट अशा गोष्टी वापरणे याबाबत दक्षता घेतल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी होऊ शकते, असे प्रतिपादन सहायक वाहतूक पोलीस निरीक्षक एस.एन.घाडगे यांनी महावीर महाविद्यालयात वाहतूक सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले.
अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्या डॉ.रूपा शहा होत्या.    वाहतूक सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने शहर वाहतूक विभागाच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वाहतूक सुरक्षेसाठी कशाप्रकारे दक्षता घ्यावी, याबाबत विद्यार्थी वर्गाला चित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर सहायक वाहतूक पोलीस निरीक्षक घाडगे यांनी अपघात होण्याची कारणे, त्यासंदर्भातील आकडेवारी तसेच वाहनांची योग्यप्रकारे देखभाल याबाबत तपशीलवार माहिती दिली. मुलींनी आणि महिलांनी वाहन चालवितांना व दुचाकीवर बसतांना कोणती काळजी घ्यावी, हेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी, प्रभारी प्राचार्या डॉ.रूपा शहा यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला.तर अखेरीस महाविद्यालयाच्या बी.ए., बी.एड. विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.एम.ए.मायगोंडा यांनी आभारप्रदर्शन केले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या वाहतूक विभागात कार्यरत असणारे कॉन्स्टेबल हुंबे, तसेच विद्यार्थी वर्गाची या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती होती.