जाते, पाटा-वरवंटा आणि खलबत्त्याची जागा शोकेसमध्ये विराजमान
इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांची स्वयंपाकघरातील कामासाठी लागणारा वेळ आणि शक्ती वाचली आहे. स्वयंपाकातील चिरणे, वाटणे यांसारख्या अनेक गोष्टी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीने झटपट केल्या जात असल्या तरी पाटा-वरवंटाच्या वापरातून तयार झालेले वाटण असो की चटणी असो त्याची लज्जत न्यारीच असते. परंतु, आता दगडी जाते, पाटा-वरवंटा तसेच खलबत्ता यासारख्या दगडी वस्तूंवरही कलाकुसर केली जायची. आता या दगडी वस्तू मात्र ‘शोभिवंत वस्तू’ म्हणून गणल्या जाऊ लागल्या आहेत. जात्यावर दळलेले पीठ, खलबत्त्यात कुटलेले दाणे या गोष्टी इतिहासजमा होऊ लागल्या आहेत.
पारंपरिक पद्धतीने तयार केले जाणारे जेवण रुचकर लागते. गेली अनेक वर्षे मासेमारी करणाऱ्या बोटींवर जेवण शिजविले जाते. त्यासाठीचे वाटण पाटा-वरवंटय़ानेच वाटले जाते त्यामुळे त्याचा वास आणि स्वाद हा निराळाच येत असल्याचे मत मुकेश थळी याने व्यक्त केले. पारंपरिक व जेवणाची रुची वाढविणाऱ्या व कलाकुसरीचा नमुना असलेले पाटे-वरवंटे, खलबत्ते व जाते बनविण्याचे काम उरण परिसरात केले जात आहे. मात्र यासाठी लागणारा चांगल्या प्रतीचा दगड सध्या आढळत नसल्याने आणि तरुणाई या व्यवसायात येत नसल्याने दगडाच्या वस्तूही महाग झाल्याचे मत दगडापासून वस्तू बनविणाऱ्या सीताराम कोष्टी या कारागिराने व्यक्त केले. तर अनेक जण सध्या या वस्तू वापरासाठी कमी तर शोभेसाठीच घेऊन जात असल्याचेही मत त्यांनी या वेळी ‘महामुंबई वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केले.
जात्यावर दळलेले पीठ आणि गिरणीमधून दळून आणलेले पीठ स्वयंपाकात वापरले तर चवीचा फरक लक्षात येतो. तसेच मिक्सरमध्ये वाटलेली चटणी आणि पाटा-वरवंटय़ाच्या साहाय्याने तयार केलेली चटणी असो की सामिष भोजनासाठी लागणारा मसाला असो चवीमध्ये खूपच फरक पडतो याचा अनुभव सर्वानीच घेतला आहे. परंतु, आजच्या झटपट युगात दगडापासून तयार केलेल्या खलबत्ता, पाटा-वरवंटा यांसारख्या वस्तूंची गणना आता शोभिवंत वस्तू म्हणून केली जाऊ लागली आहे, असेही दगडापासून वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांनी सांगितले. 

– जगदीश तांडेल, उरण