News Flash

पलायन नाटय़ानंतर वसतीगृहास सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची प्रतीक्षा

अडचणीत सापडलेल्या निराधार महिला, कारवाईत सापडलेल्या बारबाला, कुमारी माता व निराधार महिलांच्या बाळंतपणात माहेर घराची भूमिका निभावणाऱ्या या वसतीगृहाने सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

| February 21, 2014 02:53 am

अडचणीत सापडलेल्या निराधार महिला, कारवाईत सापडलेल्या बारबाला, कुमारी माता व निराधार महिलांच्या बाळंतपणात माहेर घराची भूमिका निभावणाऱ्या या वसतीगृहाने सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती.
रखवालदाराच्या डोळ्यात मिरची पूड फेकत आणि महिला पोलिसांना खोलीत बंद करत बारबालांच्या सामूहिक पलायनाच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, शहरातील शासकीय वात्सल्य महिला वसतीगृहात सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणा बसविण्याची यापूर्वी केलेल्या मागणीकडे व्यवस्थापनाचे लक्ष लागले आहे. अडचणीत सापडलेल्या निराधार महिला, कारवाईत सापडलेल्या बारबाला, कुमारी माता व निराधार महिलांच्या बाळंतपणात माहेर घराची भूमिका निभावणाऱ्या या वसतीगृहाने सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. तथापि, कित्येक महिने उलटूनही आयुक्तालयाने त्या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.
ठाणे पोलिसांनी कारवाईत पकडलेल्या ४१ बारबालांना मध्यवस्तीतील या वसतीगृहात ठेवण्यात आले होते. न्यायालयाकडून अपेक्षित निर्णय दिला जात नसल्याने अस्वस्थ झालेल्या १७ बालबारांनी बुधवारी पहाटे वसतीगृहातून धूम ठोकली. अतिशय नियोजनबध्द पध्दतीने त्यांनी प्रथम बंदोबस्तावरील महिला पोलिसांच्या खोलीस बाहेरून कडी लावली. मग, मुख्य प्रवेशद्वारावरील रखवालदाराच्या डोळ्यात मिरची पूड फेकून पलायन केले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबविली. पळालेल्या आठ जणींना पकडण्यात यश मिळाले. परंतु, नऊ बारबाला पळून जाण्यात यशस्वी झाल्या. या घटनाक्रमामुळे वसतीगृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मल्हार खाण झोपडपट्टीला लागून असणारे वसतीगृह पुणेस्थित महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या अखत्यारीत येते. झोपडपट्टीमुळे वसतीगृहाबाहेर टवाळखोरांचा नेहमी वावर असतो. निराधार, संकटग्रस्त व अडचणीत सापडलेल्या युवती व महिलांचे हे वसतीगृह हक्क्याचे निवासस्थान. नव्याने बांधलेल्या तीन मजली इमारतीत पीडित मुली व महिलांची निवासाची व्यवस्था केली जाते. वसतीगृहात वर्षभरात सरासरी दीडशे युवती व महिला वेगवेगळ्या कारणांनी येत असतात.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने वसतीगृहाची मुख्य इमारत, कार्यालय व आसपासच्या परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने काही महिन्यांपूर्वीच पाठविला आहे. वसतीगृहाची १०० जणांची क्षमता आहे. कुमारीमाता वा इतर ठिकाणी राहणाऱ्या निराधार महिला बाळंतपणाकरिता येथे येत असतात. पोलिसी कारवाईत सापडलेल्या बारबाला व देहविक्रय करणाऱ्या महिलांना पुनर्वसनार्थ काही दिवस या ठिकाणी आणले जाते. वसतीगृहातील महिला व युवतींच्या संख्या वाढल्यावर सर्वावर नजर ठेवणे अवघड बनते. वसतीगृहात एक कर्मचारी व दोन सत्रात प्रत्येकी एक रखवालदार यांच्यावर सुरक्षिततेची भिस्त असते. आवश्यक तेव्हा महिला पोलिसांचा बंदोबस्त उपलब्ध होत असला तरी पुरूष पोलीस कर्मचाऱ्यांची केलेली मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याचे वसतीगृहाच्या प्रमुख अधिकारी नलिनी पाटील यांनी सांगितले. वसतीगृहाच्या सुरक्षिततेसाठी काही महिन्यांपूर्वी सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणेचा प्रस्ताव आयुक्तालयाकडे व्यवस्थापनाने पाठविण्यात आला होता. परंतु, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. बारबालाच्या पलायनानंतर त्या यंत्रणेचे महत्व महिला व बालकल्याण विभागाच्या लक्षात येईल, अशी व्यवस्थापनाला आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 2:53 am

Web Title: cctv cameras to be installed nashik correction home
Next Stories
1 विद्यापीठाच्या शिक्षक प्रबोधिनीमुळे निरंतर शिक्षणाला चालना
2 जल प्रदूषणाविरोधात एका प्राचार्याची व्याख्यानमाला
3 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त ‘सप्तक’ महापालिकेकडून सन्मानित
Just Now!
X