News Flash

सावरणं नव्हे हे तर केवळ उरकणं

दहा ते बारा वाहनांच्या ताफ्याचा धुराळा.. नुकसानग्रस्त गावातील एखाद्या शेतकऱ्याची अवघ्या काही मिनिटात जाणून घेतलेली व्यथा..

| March 14, 2014 04:05 am

दहा ते बारा वाहनांच्या ताफ्याचा धुराळा.. नुकसानग्रस्त गावातील एखाद्या शेतकऱ्याची अवघ्या काही मिनिटात जाणून घेतलेली व्यथा.. त्यातही नुकसानीच्या आकडेवारीत ताळमेळ नसल्यावरून कृषी अधिकाऱ्यांची खरडपट्टी.. पथकाने आपल्या गावात पाहणी करावी म्हणून भदाणे येथे पावसात थांबलेले शेतकरी.. आणि त्यांच्या भावनांची पर्वा न करता पुढील गावी निघालेला ताफा..
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात दाखल झालेल्या बहुचर्चित केंद्रीय समिती दौऱ्याच्या पहिल्या दिवसाचे हे चित्र. ग्रामीण भागात शेती पूर्णत: उध्वस्त झाली असताना केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी तुरळक ठिकाणी भेट देऊन पाहणीचे सोपस्कार पार पाडले. पूर्वनियोजित कार्यक्रमात ऐनवेळी बदल करत नाशिकऐवजी हे पथक प्रथम धुळे जिल्ह्यात गेले.
अवकाळी पाऊस व गारपिटीने उत्तर महाराष्ट्रात एक लाख दहा हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तयाची पाहणी करण्यासाठी आर. एल. माथूर, एस. एम. कोल्हटकर व संजीव चोप्रा या केंद्रीय समितीचे पथक नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. गुरूवारी सकाळी या अधिकाऱ्यांचे नाशिकरोडच्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात आगमन झाले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पथक पहिल्या दिवशी नाशिकमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार होते. परंतु, या कार्यक्रमात अचानक बदल करून पथकाने धुळे जिल्ह्यात जाण्याचा निर्णय घेतला. मग, केंद्रीय पथकाला घेऊन कृषी अधिकाऱ्यांनी धुळ्याकडे कूच केले. पथकाला घेऊन निघालेल्या ताफ्यात जवळपास दहा ते बारा वाहनांचा समावेश होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास हे पथक धुळ्यातील बिलाडी गावी पोहोचले. येथील प्रशांत गुजर यांच्या शेतीची पथकाने पाहणी केली. गारपिटीत हाताशी आलेला गहू भुईसपाट झाला. आता घरात खाण्यासाठी गहू शिल्लक नसल्याची व्यथा गुजर यांनी मांडली. या परिस्थितीत शेतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज पुरवठा सुरळीत करून कर्जमाफी देण्याची विनंती त्यांनी केली. केंद्रीय पथक येणार म्हणून आसपासचे शेतकरी या ठिकाणी जमा झाले होते. परंतु, पथकातील अधिकाऱ्यांनी इतरांशी संवाद साधण्याची तसदी घेतली नाही.
बिलाडी गावातून हे पथक लगेच जपीकडे मार्गस्थ झाले. या गावातील प्रमोद विश्वास पाटील यांच्या उध्वस्त झालेल्या केळी बागेसह गहू, हरभरा, भाजीपाला पिकांची पथकाने पाहणी केली. केळी बागेसाठी पंधरा लाख रुपयांचे कर्ज काढले होते. या पिकाला विमा नसल्याने आपण पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे पाटील यांनी सांगितले. शेतीत काम करणाऱ्या मजुरांना मजुरी देण्यासाठी आपल्याकडे काही राहिले नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. नुकसानीची आकडेवारी पडताळून पाहताना त्यात ताळमेळ नसल्याचे पथकास निदर्शनास आले. त्यावरून सर्वासमक्ष त्यांनी स्थानिक कृषी अधिकाऱ्यांची हजेरी घेतली.
अवकाळी पावसाच्या तडाख्याने उध्वस्त झालेल्या कापडणे येथील सतीश पाटील या शेतकऱ्याने आत्महत्या केली. पथकाने त्यांच्या कुटुंबियांना भेट देऊन मानसिक आधार द्यावा, अशी ग्रामस्थ व स्थानिक आमदारांची अपेक्षा होती. परंतु, पथकाने त्या गावात जाण्याचे टाळून साक्रीचा रस्ता धरला. दौरा सुरू असताना धुळे जिल्ह्यात आकाशात काळे ढग दाटले होते. काही भागात पावसाला सुरूवात झाली. यावेळी भदाणे गावातील शेतकरी भर पावसात पथकाची प्रतीक्षा करत होते. या पथकाने नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करावी अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी संबंधितांची वाहने रोखण्याचाही प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी हस्तक्षेप करत केंद्रीय पथकाला वाट मोकळी करून दिली.
स्थानिक आमदारांना मज्जाव आणि वाद
केंद्रीय पथकाच्या दौऱ्यादरम्यान मतदार संघातील नुकसानग्रस्त भागाची माहिती देऊ इच्छिणारे स्थानिक आमदार शरद पाटील यांना या दौऱ्यात सहभागी होण्यास जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेचे कारण देऊन मज्जाव केला. या कारणास्तव आ. पाटील आणि अधिकारी यांच्यात शाब्दीक वादविवादही झाले. आचार संहितेच्या नियमावलीत असा कुठेही उल्लेख नाही. असे असताना केंद्रीय पथक व जिल्हा प्रशासनाने हेतुपुरस्सर विरोधी पक्षातील आमदाराला दौऱ्यात सहभागी होऊ दिले नसल्याची तक्रार त्यांनी केली.
धुळे जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करताना केंद्रीय पथक. (छाया – दीपक जोशी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2014 4:05 am

Web Title: central team arrives in maharashtra to assess crop loss
Next Stories
1 सोमय्यांच्या यादीत नाव नसलेला असा मनसेचा उमेदवार
2 असमन्वय दूर करण्यासाठी आता महायुतीची समन्वय समिती
3 ‘विजयानंद’चे रुपेरी शतक
Just Now!
X