अपशब्द वापरून धमकावले, शिवीगाळ
पाथर्डीचे माजी आमदार व जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोनिका राजळे यांचे पती राजीव राजळे यांनी अपशब्द वापरुन शिवीगाळ केल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांनी ग्रामविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेत उमटली असून राजपत्रित अधिकारी संघटनेने काळ्या फिती लावून लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना आज दिले.
सीईओ रुबल अग्रवाल दिर्घ मुदतीच्या रजेवर गेल्यानंतर ३ सप्टेंबर २०१२ पासून पदाची प्रभारी सुत्रे पाटील यांच्याकडे आहेत. पाटील यांनी प्रधान सचिवांना काल पाठवलेल्या तीन पानी पत्रात माजी आमदार राजळे ७ डिसेंबरपासून दूरध्वनीवर माझा उपमर्द व अवहेलना होईल अशा पद्धतीने शिवीगाळ करुन दबाव आणण्याचा व मानसिकदृष्टय़ा त्रास देत असल्याची तक्रार केली आहे. राजळे यांनी कोणकोणत्या प्रकरणात दूरध्वनी करुन त्रास दिला, याची उदाहरणे या पत्रात नमूद केली आहेत.
या सर्व घटनांबाबत पालकमंत्री, जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना माहिती दिलेली आहे, सर्व अधिकारी व कर्मचारी निषेधाचे आंदोलन करणार होते, मात्र पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आंदोलन स्थगित करण्यात आले.
पटसंख्या कमी झाल्याने अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन ते पुढे न ढकलल्यास तुमच्याकडे बघून घेऊ, असे कितीतरी अतिरिक्त सीईओ, डेप्युटी सीईओ माझे पाय चाटतात, हे तुम्ही लक्षात ठेवा, अशी दमबाजी केली. दि. १ जानेवारीस राजळे यांनी दूरध्वनी करुन, तुम्ही पाथर्डीतील नरेगाची कामे मुद्दामच बंद पाडता, आमच्या चौकशा लावता, असे म्हणून अपशब्द वापरले व गरज पडल्यास अधिकाऱ्यांना काळे फासू अशी धमकी दिली. तुम्ही पाथर्डीतील कर्मचाऱ्यांवर आकसबुद्धीने कारवाई करुन योजनेचे काम बंद पाडता, तुमच्याबद्दल माझे चांगले मत होते, परंतु आता ते बदलले आहे, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. पाथर्डीचे बीडीओ सुधाकर मुंडे यांना निलंबीत करण्यात आल्याचे समजताच राजळे यांनी सायंकाळी मला दूरध्वनी करुन मुंडे यांच्यावर तुम्ही डूक धरुन कारवाई केली असे म्हणून अपशब्द वापरले, असे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
‘त्या’ शिक्षकांवरील कारवाईलाही विरोध
प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी काही प्राथमिक शिक्षकांनी खोटे अपंग प्रमाणपत्र सादर केले, अशा ७६ शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली, त्यावरही राजळे यांनी अजिबात केसेस दाखल करु नका, दाखल करायच्या तर आम्ही सांगतो त्या प्रत्येक गोष्टीत केसेस दाखल कराव्या लागतील, केसेस दाखल केल्या तर तुम्हाला वाईट गोष्टीस सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली, असे पाटील यांनी पत्रात नमुद केले आहे.