कारखान्यांचा उतारा सर्वात कमी ९.८२ टक्के
यंदाच्या ऊस गाळप हंगामात सुरू झालेल्या विदर्भातील सात कारखान्यांपैकी सहा कारखान्यांनी हंगाम बंद केला असून गेल्या वर्षीपेक्षा ऊसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादन जास्त झाले असले, तरी उतारा मात्र कमी आला असून राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत अमरावती आणि नागपूर विभागात उताऱ्यामध्ये झालेली घट हा खाजगी कारखान्यांसमोर चिंतेचा विषय बनला आहे.
विदर्भात गेल्या दोन दशकांमध्ये उभारलेले गेलेले साखर कारखाने झपाटय़ाने बंद पडत गेले, त्यातील सर्वाधिक कारखाने हे सहकारी तत्वावरील होते. यंदा विदर्भात केवळ एक सहकारी कारखाना गाळप हंगात घेऊ शकला. इतर सहा खाजगी कारखान्यांनी साखर उत्पादनात भर टाकली. या सर्व कारखान्यांनी ११ लाख ९९ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून ११ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखरेचा उतारा हा ९.८२ टक्के आहे. गेल्या वर्षी हंगामाच्या अखेरीस विदर्भातील सहा साखर कारखान्यांनी ८ लाख ८४ हजार मे.टन ऊस गाळप आणि ९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. उतारा त्यावेळी १०.०२ टक्के होता.सहकारी कारखान्यापैकी यंदा हंगाम सुरू करणाऱ्या एकमेव वसंत सहकारी साखर कारखान्याने (पुसद, जि. यवतमाळ) २ लाख ६६ हजार ५९४ मे. टन ऊसाचे गाळप केले आणि २ लाख ८८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. उतारा विदर्भातून सर्वाधिक १०.८० टक्के आला. खाजगी साखर कारखान्यापैकी विदर्भ शुगरने (कुऱ्हा, जि. अमरावती) १० हजार ८४८ मे.टन गाळप आणि ६ हजार ५१५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले उतारा सर्वात कमी म्हणजे केवळ ६.०१ टक्के आहे. गेल्या १५ एप्रिलला या कारखान्याने हंगाम बंद केला.
डेक्कन शुगरने (मांगरूळी, जि. यवतमाळ) १ लाख ६८ हजार मे.टनाचे गाळप करीत १ लाख ६६ हजार क्विंटल साखरेची भर टाकली. महात्मा शुगर अ‍ॅन्ड पॉवरने (जामठी, जि.वर्धा) २ लाख ६२ हजार मे.टन गाळप, २ लाख २ हजार क्विंटल उत्पादन, पूर्ती पॉवर अ‍ॅन्ड शुगरने (उमरेड, जि. नागपूर) २ लाख ८२ हजार मे.टन गाळप, २ लाख ५५ हजार क्विंटल उत्पादन, वैनगंगा शुगर अ‍ॅन्ड पॉवरने (मोहाडी, ता. भंडारा) २ लाख ९ हजार मे.टन गाळप, १ लाख ८८ हजार क्विंटल उत्पादन, नेचर ग्रोअर्सने (लाखांदूर, जि. भंडारा) ५८ हजार ६७३ मे.टन ऊसाचे गाळप करून ५५ हजार ४७८ क्िंवटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या साखर कारखान्यांचा उतारा देखील १० टक्क्यांच्या आतच आहे.
साखरेचा उतारा कमी आल्यास कारखान्यांना तोटा सहन करावा लागतो. राज्यात १३ टक्क्यांपर्यंत साखरेचा उतारा घेणारे अनेक कारखाने आहेत. विदर्भात मात्र सातत्याने उतारा कमी आहे. ऊस तोडणी कामगारांची कमतरता, ऊस लागवडीचे घटते प्रमाण याचा सामना विदर्भातील साखर कारखान्यांना करावा लागत आहे.  
हे कारखाने शेतकऱ्यांनाही पूर्ण न्याय देण्यात असमर्थ ठरले आहेत. विदर्भात साखर कारखान्याचे अस्तित्व खाजगी उद्योगांनी टिकवून ठेवले असले, तरी साखरेचा कमी उतारा हा प्रश्न त्यांच्यासमोरही आहे. ऊस लागवडीसाठी अनुकूल वातावरण नसतानाही केलेला अट्टाहास अनेक कारखान्यांच्या मुळाशी आल्याची उदाहरणे आहेत.