मध्य रेल्वेवरील महत्त्वाकांक्षी डीसी-एसी विद्युत प्रवाहासाठीचा महामेगा ब्लॉक रविवारी रात्री पार पडल्यानंतर सोमवारपासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सर्व गाडय़ा एसी विद्युत प्रवाहावर धावण्यास सुरुवात झाली आहे. या एसी विद्युतप्रवाहामुळे विजेची आणि वेळेचीही बचत होणार असली, तरी एसी विद्युतप्रणाली नियमित होण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रवाशांसाठी आणि मध्य रेल्वे प्रशासनासाठीही पुढील दोन महिने कसोटीचे ठरणार आहेत. त्यातच पावसाचे आगमन झाल्यास अडचणींत भर पडू शकते.
डीसी-एसी विद्युत परिवर्तनामुळे मध्य रेल्वेवर विजेची बचत ३३ टक्के एवढी होणार आहे. तसेच आतापर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांना कसारा-कर्जत किंवा इगतपुरी-लोणावळा येथे घ्यावा लागणारा १५ मिनिटांचा थांबाही घ्यावा लागणार नाही. त्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. हे परिवर्तनाचे काम रविवारच्या मध्यरात्री आणि सोमवारी पहाटेपर्यंत पूर्ण करण्यात आले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील गाडय़ांचा वेगही वाढण्याची शक्यता आहे.
विद्युतप्रणालीमध्ये बदल झाल्यानंतर ही प्रणाली नियमित होईपर्यंत काही वेळा त्यात तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते. आतापर्यंत १५०० व्होल्टवर चालणारी डीसी प्रणाली बदलून त्या जागी २५ हजार व्होल्टची एसी प्रणाली सुरू केल्यावर काही ठिकाणी ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होणे, काही पॉइण्ट्समध्ये बिघाड होणे अशा गोष्टी संभवतात. पश्चिम रेल्वेवर डीसी-एसी परिवर्तनाचे काम झाल्यावर तेथेही अशाच प्रकारचे बिघाड दोन ते तीन महिने सातत्याने होत होते. विद्युत प्रवाहात झालेला हा बदल नियमित होण्यास थोडा वेळ लागतो, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
प्रवाशांना या प्रकाराचा जास्त त्रास होऊ नये, कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे तसेच इतर कर्मचारी तयार आहेत. कोणताही बिघाड झाल्यास तो तातडीने दूर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने पूर्ण तयारी केली आहे, असेही या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.