बनावट रेशनकार्ड तयार करून स्वस्त धान्य व इंधनाची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी निवृत्त नायब तहसीलदार भाऊराव नेमाजी जाधव याच्यासह सहाजणांविरुद्ध हदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली असली, तरी एकाही आरोपीला अटक करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवले नाही.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून बनावट रेशनकार्ड तयार करून त्याआधारे स्वस्त धान्य व रॉकेल काळ्या बाजारात विक्री करण्याचा गोरख धंदा तहसील कार्यालयातल्या काहींनी सुरू केला होता. बनावट नावाने रेशनकार्ड तयार करायचे, या कार्डावर धान्य व इंधन उचलायचे, त्याची काळ्या बाजारात विक्री करायची असा प्रकार लक्षात आल्यानंतर हदगावचे सामाजिक कार्यकर्ते बजरंग नरवाडे यांनी रीतसर तक्रारी केल्या. पण तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली. उघड सुरू असलेल्या या भ्रष्टाचाराबाबत नरवाडे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
पोलीस व महसूल यंत्रणा आरोपींना पाठीशी घालण्यात धन्यता मानत असल्याने नरवाडे यांच्या तक्रारीवरून न्यायालयाचे निवृत्त नायब तहसीलदार भाऊराव जाधव, निलंबित कारकून नरसिंग ठाकूर, स्वस्तधान्य दुकानाचा चालक दिगंबर रंगनाथ दमकोंडवार, श्रीनिवास दिगंबर दमकोंडवार, सुधाकर पवार व रामदास मस्के या सहाजणांविरुद्ध फसवणूक करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, संगनमत करणे आदी आरोपावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार हदगाव पोलिसांनी या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला, तरी एकाही आरोपीला अटक करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गैरप्रकारात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला.