भरधाव कार रस्त्यात उभ्या असलेल्या बसवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात कारमध्ये असलेल्या नागपुरातील किराणा व्यावसायिकाच्या कुटुंबिय गंभीर जखमी झाले. त्यात पाच वर्षांच्या मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पती, पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात वर्धा-पुलगाव मार्गावर गुरुवारी रात्री ९.३० वाजता घडला.
कार्तिक संजय खन्ना (५ वर्षे) असे मृत मुलाचे नाव आहे. संजय प्रकाशचंद खन्ना (४०), पत्नी नीलम (३२) आणि मुलगी  खुशी (१०), अशी गंभीर जखमींची नावे आहेत. या सर्वावर धंतोलीतील मेडिट्रिना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात नीलमची स्थिती चिंताजनक आहे. तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. खन्ना कुटुंब वर्धमाननगरातील रहिवासी असून ते किराणा व्यावसायी आहेत. गुरुवारी रात्री खन्ना कुटुंब दिवाळी निमित्त पुलगाव येथील नातेवाईकांकडे कारने (क्र. एमएच-३१सीएच-६०६९) जात होते. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वर्धा-पुलगाव मार्गावर बस (क्र. एमएच-२६ एच-६६६८) उभी होती. वेगात असलेली कार या बसवर जाऊन आदळली. यात कार्तिकचा गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. तर संजय खन्ना, नीलम आणि खुशी हे गंभीर जखमी झाले. या सर्वाना सर्वप्रथम वर्धा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांना शुक्रवारी सकाळी नागपुरात आणण्यात आले.
जखमींना नागपुरात आणल्याची माहिती मिळताच शहरातील व्यापाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. शुक्रवारी सकाळी वर्धेतील शासकीय रुग्णालयात कार्तिकच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास करत आहेत.