आघाडी सरकारच्या काळात पाया घालण्यात आलेल्या नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादरीकरण दाखविण्यासाठी सिडको सज्ज झाली असून देशातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबरोबरच मेट्रो, गृहनिर्माण योजना, पनवेल रेल्वे टर्मिनल्स, उरण-पनवेल रेल्वे मार्ग, ग्रामविकास, भूमिपुत्र, पत्रकार भवन आणि औरंगाबाद येथील हाजी हाऊस व वंदे मातरम् सभागृह यांचे सादरीकरण दाखविले जाणार आहे. विमानतळाचा निदान पायाभरणी समारंभ तरी आपल्या कारकिर्दीत पार पडावा यासाठी अनेक प्रयत्न करणाऱ्या आघाडी सरकारच्या वाटय़ाला हे श्रेय येऊ शकले नाही. भाजप सरकारच्या काळात नवी मुंबई विमानतळाचा पहिला टेक ऑफ होण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे पाया घातलेल्या आघाडी सरकारच्या या प्रकल्पावर कळस चढविण्याचे काम भाजप सरकार पार पाडणार आहे.
राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोकडे पाहिले जात असून सध्या सिडकोच्या तिजोरीत साडेसात हजार कोटी रुपये ठेवी स्वरूपात पडले आहेत. सिडकोचा हा निधी मध्यंतरी नागपूरमधील मिहान प्रकल्पासाठी वळविण्याचा घाट रचला जात होता. त्याला मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी विरोध केला होता. राज्य सरकारवरील अवाढव्य कर्जामुळे कडकीत असलेल्या सरकारचा सिडकोच्या तिजोरीवर पहिल्यापासून डोळा आहे. त्यामुळे येत्या काळात सिडकोचा फार मोठा निधी सरकारच्या प्रकल्पावर खर्च होण्याची शक्यता आहे. अशा या श्रीमंत महामंडळाच्या उच्च अधिकाऱ्यांना येत्या एक-दोन दिवसांत मुख्यमंत्री बोलावणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभाग स्वत:कडे ठेवल्याने नगरविकास विभागाच्या सादरीकरणाच्या वेळी सिडको प्रकल्प व सद्यस्थितीवर चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी सिडकोने सर्व गृहपाठ तयार केला आहे. यात राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमानतळाच्या उभारणीतील अडचणी आणि त्याची ग्लोबल निविदा याबाबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया हे सादरीकरण करणार आहेत. सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी सिडकोच्या तयारीची माहिती दिली. याशिवाय नगरविकास राज्यमंत्र्यांनादेखील हे सादरीकरण यानंतर दाखविले जाणार आहे. सिडकोच्या विमानतळ प्रकल्पाबरोबरच बेलापूर ते पेंदार मेट्रो रेल्वे मार्ग, खारघर येथे मोठय़ा प्रमाणात उभारण्यात येत असलेले गृहनिर्माण प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला पर्याय ठरू शकणारे पनवेल येथील नियोजित १४ स्थानकांचे राष्ट्रीय रेल्वे टर्मिनल्स, उरण-पनवेल व नेरुळ-उरण रेल्वे मार्ग, खारघर येथे बांधून तयार असलेले ग्रामविकास भवन, नेरुळप्रमाणेच द्रोणागिरी येथील भूमिपुत्र भवन व नेरुळ येथील पत्रकार भवन यांची माहिती दिली जाणार असून प्रस्तावित विमानतळाच्या कामाची ग्लोबल निविदा येत्या दोन महिन्यांत काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.