अल्प उत्पन्न गट, दारिद्रय़रेषेखालील गट तसेच कामगारांना हक्काचे घर मिळावे या मागणीसाठी मार्क्‍सवादी कामगार पक्ष आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) यांच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.
सकाळी १० वाजता गोल्फ क्लब मैदानापासून मोर्चाला सुरुवात होणार असून तो म्हाडा कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य सीटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, अ‍ॅड. वसुधा कराड, जिल्हाध्यक्ष श्रीधर देशपांडे हे करणार आहेत. जवाहरलाल नेहरू योजनेंतर्गत बांधण्यात आलेली २५ टक्के घरे असंघटित, कंत्राटी, घरेलू तसेच बंद कारखान्यातील कामगारांना द्यावीत, झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या राहत्या ठिकाणीच घरे बांधून द्यावीत, केंद्र व राज्य शासनाने म्हाडा, सिडको व महानगरपालिकेमार्फत अल्प उत्पन्न, असंघटित कामगार, टपरीधारक, रिक्षाचालक व अन्य कष्टकरी जनतेसाठी अल्पदरात घरबांधणी योजना राबवावी, सीटूचे प्रदेश अध्यक्ष नरसय्या आडम यांचे अनुकरण करून नाशिकमध्ये घरबांधणी योजना राबवावी आदी प्रमुख मागण्या आहेत. मोर्चात सर्वानी सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.