‘लोकसत्ता’च्या वाचकांच्या प्रतिक्रिया
खरे तर गेली अनेक वर्षे मुंबईतच राहातो आहोत पण आपल्या आजूबाजूला असलेल्या या वैविध्यपूर्ण जंगलाची फारशी माहिती नव्हती. ती करून घेण्याची इच्छा अनेक वर्षे मनात घर करून होती पण आपल्याला घेऊन कोण जाणार असा प्रश्न मनात नेहमीच यायचा. पण मुंबई विद्यापीठाचा बहिशाल शिक्षण विभाग, लोकसत्ता आणि नॅशनल पार्कने ही इच्छा पूर्ण केली, याच आशयाच्या प्रतिक्रिया या सिटीवॉकमध्ये सहभागी झालेल्या लोकसत्ताच्या वाचकांनी व्यक्त केल्या. या उपक्रमात सहभागी वनिता पाटील म्हणाल्या की, आजूबाजूला नेहमीच दिसणाऱ्या या वनस्पतींचे औषधी गुणधर्म ठावूक नव्हते ते या उपक्रमातून कळले. खरेतर त्या दिवशी खूप पाऊस होता. पण, तरिही आम्ही या उपक्रमाचा चांगला आनंद घेतला. परत एकदा या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल. स्नेहा दामले म्हणाल्या की, मुंबईत राहूनही निसर्गाच्या सान्निध्यात जाता आले, याचा आनंद झाला. या जंगलातील काही वृक्ष इतर वेळी पाहायलाही मिळत नाहीत. दिसले तरी त्यांची माहिती देणारे कोणीच नसते. त्यामुळेच हा सिटी वॉक जास्त भावला. वैष्णवी वाघ त्यांच्या १३ वर्षांच्या मुलासह या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, आम्हा दोघांनाही सिटीवॉक प्रचंड भावले. झाडे, फुले, पक्षी, फुलपाखरे या साऱ्यांची  माहिती यातून मिळाली. विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम नेहमी आयोजित करायला हवेत. वर्षांसहलीत रानवाटांवरची रानफुले आणि वनस्पती नेहमीच मन मोहून घ्यायच्या. आतून असे वाटायचे की आपल्या मातीतील या वनस्पतींची ओळख असावी आणि ती देखील या विषयातील तज्ज्ञ मंडळींकडून. ही इच्छा ‘लोकसत्ता सिटीवॉक’च्या माध्यमातून पूर्ण झाली, अशी प्रतिक्रिया मुलुंडच्या प्रज्ञा पाठारे यांनी व्यक्त केली. तर अरुण वायंगणकर म्हणाले की, हा अतिशय माहितीपूर्ण उपक्रम आहे. विद्यापीठातून आलेल्या सर्व तज्ज्ञ मंडळींकडे त्यांच्या विषयाची भरपूर माहिती होती. कार्यालयात वेळेत पोहोचायचे असल्याने तेथे पूर्ण वेळ थांबता आले नाही. मात्र पुढच्या वेळी बायको आणि मुलासोबत येणार व पूर्ण वेळ थांबणार, असे आताच ठरवले आहे. बीना पितळे म्हणाल्या की, एरवी नेहमीच्या धकाधकीत आजूबाजूच्या झाडांकडे लक्षही नसते. परंतु सिटीवॉकच्या माध्यमातून औषधी वनस्पतींची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. हा उपक्रम खरोखर अनोखा आहे. किमान त्यामुळे रोजच्या धावपळीतून काहीतरी वेगळं अनुभवायला मिळालं. या उपक्रमात सहभागी आणखी एक लोकसत्ताच्या नियमित वाचक पुर्णिमा हैबत म्हणाल्या की, मुंबईच्या जवळ इतकं सुंदर जंगल आहे ज्याची आपल्याला कल्पनाही नाही. या सिटीवॉकला गेल्यावर खऱ्या अर्थाने या जंगलाची महती पटली. जंगलाचे वैविध्यपूर्ण सौंदर्य या निमित्ताने अनुभवता आले.
सिटीवॉकच्या नोंदणीसाठी
सिटीवॉकसाठी येताना प्रत्येकाने आपला नाश्ता किंवा जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली सोबत आणायची आहे. या निसर्गभ्रमंतीसाठीचे शुल्क रु. २०० असून त्यात नॅशनल पार्क प्रवेशद्वारापासून सिलोंडापर्यंतचा प्रवास आणि तज्ज्ञांचे मानधन शुल्क व पार्कचे प्रवेशशुल्क यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी संपर्क  बहि:शाल शिक्षण विभाग, दुसरा मजला, आरोग्य केंद्र इमारत, विद्यानगरी संकुल, कालिना, मुंबई. दूरध्वनी  २६५३०२६६, २६५४३०११. या शिवाय नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या तंबूमध्ये सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळात विद्यापीठाच्या प्रतिनिधींकडेही नोंदणी करता येईल.