News Flash

क्लीन अप मार्शलची खंडणीवसुली

द्रुतगती महामार्गावर शौचालयांचा अभाव, थुंकण्यासाठी अथवा कचरा टाकण्यासाठी नसलेली व्यवस्था यामुळे नागरिकांची कुचंबणा होत

| August 6, 2013 08:37 am

द्रुतगती महामार्गावर शौचालयांचा अभाव, थुंकण्यासाठी अथवा कचरा टाकण्यासाठी नसलेली व्यवस्था यामुळे नागरिकांची कुचंबणा होत
असून अनावर झाल्यामुळे आडोशाला नैसर्गिक विधी उरकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पालिकेने पुन्हा क्लीन अप मार्शल तैनात केले आहे. परंतु अवघडलेल्या नागरिकांकडून क्लीन अप मार्शल जबरदस्तीने दंड वसूल करीत असून पालिकेच्या आशीर्वादाने खंडणीखोरांची नवी टोळी मुंबईत कार्यरत झाल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.
पावसाच्या तडाख्यात पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग खड्डय़ात गेले असून नरिमन पॉइंट ते बोरिवली अथवा मुलुंडपर्यंतचा प्रवास जिकिरीचा बनला आहे. लांबलचक रांगेत अडकलेल्या वाहनांना
इंच इंच पुढे सरकण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे. दोन्ही द्रुतगती महार्गावर शौचालयांचा अभाव आहे. त्यामुळे अनेक प्रवासी महामार्गावर आडोसा पाहून लघुशंका आटोपून घेतात. मात्र या जागा क्लीन अप मार्शलनी हेरून ठेवल्या आहेत. अशीच एक मोक्याची जागा म्हणजे गोरेगावातील आरे कॉलनीजवळच्या पुलापासून वनराई कॉलनीपर्यंतचा परिसर. या परिसरात अचानक क्लीन अप मार्शलचे फलक झळकविण्यात आले. वाहने थांबवून लघुशंका करणारे,
थुंकणारे, कचरा टाकणाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा सपाटा क्लीन अप मार्शलनी लावला होता. या योजनेसाठी पालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचे क्लीन अप मार्शल कचरा करणाऱ्या नागरिकांना पकडण्यासाठी चक्क मोटरसायकलचा वापर करीत होते. ‘आधी सुविधा उपलब्ध करा आणि मगच दंड आकारा,’ अशी भूमिका घेणाऱ्या नागरिकांना पाच-सहा क्लीन अप मार्शल मिळून दंड भरण्याची बळजबरी करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही वेळा क्लीन अप मार्शल पावती न देताच ५० ते १०० रुपये घेऊन आपल्या खिशात टाकत आहेत. आरे कॉलनीजवळच्या पुलापासून वनराई कॉलनीपर्यंतच्या परिसरात १ ते ४ ऑगस्टदरम्यान क्लीन अप मार्शल कार्यरत होते. पण ५ ऑगस्ट रोजी अचानक या ठिकाणचे फलक आणि क्लीन अप मार्शल गायब झाले. त्यामुळे पालिकेच्या या योजनेबाबत शंका निर्माण झाली आहे.
ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंडय़ा
पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव ते जोगेश्वरी दरम्यान, काही ठिकाणी कचराकुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. महामार्गालगतच्या झोपडपट्टय़ांमधील नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणावर टाकण्यात येणारा कचरा वेळेवर उचलण्यात येत नसल्यामुळे त्या ओसंडून  वाहू लागल्या आहेत. कचरा वेळेवर उचलून नेण्यात येत नसल्यामुळे कचराकुंडय़ा तुडुंब भरल्या आहेत. त्यातील कचरा आसपास पसरत असून नागरिकांना नाकाला हात लावूनच जावे लागते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबद्दल पालिका कोणाकडून दंड वसूल करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
कचरा करणाऱ्या टपऱ्यांना पालिकेचाच आशीर्वाद
पश्चिम द्रुतगती महामार्गावर महानंद डेअरीजवळ पदपथावरच टपरी उभारण्यात आली आहे. हवा तो पदार्थ या टपरीमध्ये बनवून मिळतो. पदपथावरच मांडलेल्या खुच्र्यावर बसून खवय्ये पदार्थावर ताव मारतात आणि रस्त्यावर हात धुऊन निघून जातात. टपरीमधील कचरा उघडय़ावर अस्ताव्यस्त फेकण्यात येतो. मात्र त्याकडे क्लीन अप मार्शल कानाडोळा करीत आहेत. या संदर्भात टपरीमधील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, ‘दर महिन्याला आम्ही पालिकेची पावती फाडतो. त्यामुळे आमच्याकडे कोणीही चौकशीला येत नाही.’ पश्चिम द्रुतगती महार्गावर अशा अनेक टपऱ्या पालिकेच्या आशीर्वादाने सुरू आहेत. या टपऱ्यांतील निकृष्ट दर्जाचे पदार्थ आणि फेकण्यात येणारा कचरा याकडे दुर्लक्ष करणारी पालिका मात्र असुविधांमुळे नाइलाजाने रस्त्यातच आडोशाला लघुशंका उरकणाऱ्यांवर मात्र दंडात्मक कारवाई करण्यात धन्यता मानत आहे.

अतिरिक्त आयुक्त म्हणतात,
कारवाई होणारच
पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर अनेक मॉल आहेत. वाहतुकीच्या खोळंब्यात प्रवाशांना लघुशंकेसाठी मॉलमध्ये जाता येईल. त्यांनी रस्त्यावर लघुशंका करणे गैर आहे. त्यामुळे क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई होणारच, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी सांगितले.
आधी शौचालये बांधावीत आणि मग क्लीन अप मार्शल योजना राबवावी, असा प्रश्न विचारला असता अडतानी म्हणाले की, सरकारने द्रुतगती महामार्गावर ११ ठिकाणी शौचालये बांधण्याची परवानगी पालिकेला दिली आहे. मात्र शौचालये बांधेपर्यंत ही कारवाई थांबविणे अशक्य आहे. मात्र दंडाऐवजी चिरीमिरी घेणाऱ्या कचरा करणाऱ्यांना सोडणाऱ्या क्लीन अप मार्शलविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 8:37 am

Web Title: cleanup marshal takeing bribe
Next Stories
1 क्लिन अप मार्शललाच दंड
2 ‘मर्मबंधातली ठेव ही’ साहित्य संघाने जपली
3 उद्यापासून मोबाइलवरून वीज बिल भरता येणार
Just Now!
X