महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेऊन विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करून शहरातील ३५ मीटर (११ मजली) उंची अनुज्ञेय करण्याचा निर्णय नुकताच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. अशा उंचीचे परवानगी मिळणारे कोल्हापूर हे महाराष्ट्रातील तिसरे शहर आहे. यामुळे भव्य व आकर्षक एलेवेशनच्या इमारती यापुढे बांधल्या जाऊन शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे व शहर विकासात मोठी भर पडणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
 प्रचलित बांधकाम निर्देशांकामध्ये कोणतीही वाढ न करता पूर्वीच्या २१ मीटर उंचीऐवजी तेवढेच बांधकाम क्षेत्र ३५ मीटर उंचीमध्ये (११ मजल्यात) बांधावयास मिळणार असल्यामुळे अशा इमारतींना सभोवताली जास्त मोकळी जागा सुटणार आहे. गार्डन, पार्किंग व अन्य सुविधांकरिता पूर्वीपेक्षा मुबलक जागा तळमजल्यावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक, हवेशीर व अधिक प्रकाश असलेल्या इमारती बांधणे शक्य होणार आहे. या उंचीकरिता लागणारी सक्षम अग्निप्रतिबंधक सुविधा उभारणीकरीता फायर कॅपीटेशन फी मध्ये १५ रूपये प्रति चौ.मीटर इतकी शासनाने वाढ केलेली आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेस या निधीतून अद्ययावत अग्निशमन वाहने व यंत्रणा उपलब्ध करणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन क्रीडाई अध्यक्ष राजू परीख यांनी या वेळी केले. तसेच, बाल्कनीच्या मर्यादेत ५ टक्के इतकी वाढ देखील या राजपत्रात दिल्यामुळे फ्लॅटधारकांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. या फेरबदलामुळे बिल्टअप क्षेत्रामध्ये कोणतीही वाढ होणार नसून प्रचलित बांधकाम निर्देशानुसारच मिळणाऱया बांधकाम क्षेत्रामध्ये इमारती ३५ मीटर (११ मजली)उंचीपर्यंत बांधता येतील, असे क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राम पुरोहित यांनी स्पष्ट केले.    पत्रकार परिषदेस क्रीडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष अभिजित मगदूग, संचालक कृष्णा पाटील, गिरीश रायबागे, सुजय होसमणी, विजय पत्की आदींसह क्रीडाईचे सभासद मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते.आभार प्रदर्शन क्रीडाई सचिव उत्तम फराकटे यांनी केले.