देशभक्तीपर गीतांच्या ‘अमृतस्वर’ कार्यक्रमातून ‘बलसागर भारता’ला साद घालत नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या ९ हजारांवर विद्यार्थ्यांनी हुतात्मादिनी एका सुरात सामूहिक राष्ट्रगीत गायन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी, तसेच देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण लोया होते. नगराध्यक्ष पवन आडळकर, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, हैदराबाद बँकेचे सहायक महाप्रबंधक यू. राजेन्दर, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. वसंतराव खारकर, चिटणीस द. रा. कुलकर्णी, डॉ. विनायकराव कोठेकर, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, संदीप यादव, संस्थेचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचा ‘अमृतस्वर’ कार्यक्रम सादर करून उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीचे स्फुिल्लग चेतविले. ‘रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम’ या धूनने वातावरण चतन्यमय केले. त्यानंतर वैष्णव जन तो तेने कहिये जे, इतनी शक्ती हमे देना दाता, गर्जा जयजयकार क्रांतीचा, रायगडाचा पुरंदराचा.. महाराष्ट्र आमुचा, या मराठी मायभूला स्वर्ग आम्ही मानतो, माझी मायबोली आज आली माहेराला आदी गीते सादर करून वातावरण भारावून टाकले.
एका सुरात गायिलेल्या बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो व सामूहिक राष्ट्रगीताने सांगता झाली. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे, हेमलता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी सकाळी साडेसात वाजता संस्थेच्या सर्व शाळांनी शहराच्या विविध भागांतून प्रभातफेरी काढली.