News Flash

डिजिटल फलक हटविण्याच्या भूमिकेवर आयुक्त गुडेवार ठाम

डिजिटल फलकांच्या वाढत्या गर्दीमुळे सोलापूर शहराचे सौंदर्य धोक्यात येऊन होत असलेले विद्रुपीकरण रोखण्यासाठी महापालिका चंद्रकांत गुडेवार यांनी खंबीर भूमिका घेतली आहे. त्यांच्या कार्यशैलीचा अंदाज घेऊन

| September 28, 2013 02:07 am

डिजिटल फलकांच्या वाढत्या गर्दीमुळे सोलापूर शहराचे सौंदर्य धोक्यात येऊन होत असलेले विद्रुपीकरण रोखण्यासाठी महापालिका चंद्रकांत गुडेवार यांनी खंबीर भूमिका घेतली आहे. त्यांच्या कार्यशैलीचा अंदाज घेऊन काही मंडळींनी लावलेले डिजिटल फलक स्वतहून काढून घेतले. तर धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या उत्सवासाठी नवबौध्द मंडळीनी लावलेले डिजिटल फलक १३ ऑक्टोबपर्यंत हटवू नये म्हणून आयुक्त गुडेवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून मागणी केली.

परंतु ‘नो डिजिटल झोन’ मध्ये डिजिटल फलक अजिबात लावता येणार नाही आणि नव्या जागी उभारायचे असतील तर नियमांचे पालन तथा परवाने घेणे बंधनकारक असल्याचे ठणकावून सांगितले.
शहरात पोलीस व महापालिका प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे डिजिटल फलकांचे पेव फुटले आहे. विशेषत पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी डिजिटल फलकांसाठी आचारसंहिता प्रसिध्द करून त्यानुसार कायद्याची अंमलबजावणी करण्याचे धोरण जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात त्याचा कोठेही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. पोलीस आयुक्तांचे धोरण कृतीत न उतरता कागदावरच राहिले आहे. या पाश्र्वभूमीवर प्रशासन हे सामान्य नागरिकांच्या दृष्टीने नाराजीचा विषय ठरला असतानाच पालिकेचे नवे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मात्र डिजिटल फलकांच्या विरोधात खंबीर भूमिका घेतली आहे. शहरातील विविध नऊ ठिकाणी ‘नो डिजिटल झोन’ अस्तित्वात असताना नियम धाब्यावर बसवून सर्वच ठिकाणी डिजिटल फलकांचे पेव फुटले आहे. त्याची गंभीर दखल घेऊन आयुक्त गुडेवार यांनी येत्या १ ऑक्टोबरपासून डिजिटल फलकांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेण्याचे ठरविले आहे. पांजरापोळ चौकातील छत्रपती शिवरायांचा पुतळा व एसटी बस स्थानक परिसरापासून या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे.
आयुक्त गुडेवार यांच्या कार्यशैलीचा सोलापूरकरांना चांगलाच परिचय झाल्यामुळे डिजिटल फलकांच्या विरोधातील मोहीम यशस्वी होईल असा विश्वास सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. याच जाणिवेतून काही मंडळीनी रस्त्यावर लावलेले डिजिटल फलक स्वतहून काढण्यास प्रारंभ केला आहे. मात्र धम्मचक्र परिवर्तन दिन उत्सव साजरा करणाऱ्या नवबौध्द समाजातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त गुडेवार यांची भेट घेऊन धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त उभारण्यात आलेले डिजिटल फलक १ ऑक्टोबरऐवजी १३ ऑक्टोबपर्यंत हटवू नयेत, असा आग्रह धरला. परंतु आयुक्तांनी कायदा व नियम सर्वासाठी सारखे असून कायद्यापुढे कोणीही मोठे नाही, असे ठणकावून सांगत डिजिटल फलकांच्या विरोधातील भूमिका कायम ठेवली. आपण कोणाही सण, उत्सवाच्या विरोधात नाही. परंतु नियम पाळलेच पाहिजेत असे त्यांनी बजावले. या शिष्टमंडळात रिपाइंचे नगरसेवक रवि गायकवाड, दशरथ कसबे, बाळासाहेब वाघमारे, प्रमोद इंगळे आदींचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 2:07 am

Web Title: commissioner gudewar on specific role for move to digital flex
Next Stories
1 न्यायालयीन कामकाज बहिष्कारामुळे सोलापुरात सामान्य पक्षकार वेठीला
2 अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात यंदा कीर्ती शिलेदार, शौनक अभिषेकी गाणार
3 सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत सत्ताधा-यांचा धुव्वा
Just Now!
X