सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी होम मैदानावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत होम प्रदीपनाचा सोहळा पार पडला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या होम प्रदीपन सोहळ्यात प्रतीकात्मक कुंभारकन्या सती गेली. त्यानंतर पूर्वापार परंपरेनुसार भाकणुकीचाही कार्यक्रम झाला. उद्या बुधवारी रात्री भव्य शोभेच्या दारुकामाने या यात्रेची सांगता होणार आहे.
सिद्धेश्वर यात्रा व मकरसंक्रांतीला जोडून यंदा पैगंबर जयंती एकाच दिवशी असल्याने दोन्ही उत्सवांच्या मिरवणुका तेवढय़ाच थाटात निघाल्या. दोन्ही मिरवणुकांचे मार्ग काही ठिकाणी एकाच ठिकाणी येत होते. त्यामुळे या दोन्ही मिरवणुका एकमेकांसमोर येऊन भिडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात आली. विशेषत: विजापूर वेस भागात याबाबतची काळजी घेतली जात असताना सामाजिक सलोख्याचे दर्शनही घडले. यात पोलीस प्रशासनाची कसोटी पाहावयास मिळाली.
मंगळवारी सकाळी प्रथेप्रमाणे सिद्धेश्वर देवस्थानाचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या उत्तर कसब्यातील वाडय़ापासून श्री सिद्धेश्वराच्या नंदीध्वजांची मिरवणूक निघाली. पारंपरिक मार्गावरून ही मिरवणूक दुपारी सिद्धेश्वर मंदिराबाहेर संमती कट्टय़ाजवळ आल्यानंतर प्रथम श्री सिद्धेश्वराच्या योगदंडाला हळद लावून स्नान घालण्यात आले. नंतर पालखीतील सिद्धेश्वर मूर्तीलाही हळद लावून स्नान घालण्याचा विधी संपन्न झाला. त्यापाठोपाठ सर्व सात नंदीध्वजांना हळद लावून सिद्धेश्वर तलावात स्नान घालण्यात आले. मंदिरातील धार्मिक विधी आटोपल्यानंतर सर्व नंदीध्वज हिरेहब्बू वाडय़ात परत येऊन विसावले. त्यानंतर सायंकाळी हिरेहब्बू व देशमुख या प्रमुख मानकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर पुन्हा नंदीध्वज मिरवणुकीने बाहेर पडले.
रात्री जुन्या फौजदार चावडीजवळ नंदीध्वजांची मिरवणूक आल्यानंतर पसारे वाडय़ासमोर मानाच्या पहिल्या नंदीध्वजाला नागफणी बांधण्यात आली. इतर सहा नंदीध्वजांना बाशिंग बांधण्यात आले. पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी संदेश भोगडे यांनी एकटय़ाने सकाळपासून उपवास करून पन्नास किलो वजनाची नागफणी बांधलेल्या या २८ फूट उंचीचा नंदीध्वज होम मैदानापर्यंत आणला. रात्री सर्व नंदीध्वज मिरवणुकीने हळूहळू पुढे सरकत होम मैदानावर पोहोचल्यानंतर तेथे होम प्रदीपनाचा सोहळा सुरू झाला.
होमकुंडात बाजरीच्या पेंढीने तयार केलेल्या ‘कुंभार कन्ये’ च्या प्रतीकाला शालू व सौभाग्यालंकार घालून नववधूप्रमाणे सजविण्यात आले. पूजाविधी झाल्यानंतर त्या प्रतीकात्मक ‘कुंभारकन्ये’ ला हिरेहब्बू यांनी अग्नी दिला. मानकरी कुंभार यांना विडय़ाचा मान देण्यात आला. त्यानंतर सर्व नंदीध्वज, पालखी व हिरेहब्बू मंडळींनी होमकुंडाभोवती पाच प्रदक्षिणा घातल्या. या वेळी सिद्धेश्वर महाराजांच्या जयजयकाराने अवघा आसमंत दुमदुमून गेला होता.
साडे आठशे वर्षांपूर्वी शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांशी एका कुंभारकन्येने विवाह करण्याची इच्छा प्रकट केली होती. सिद्धेश्वर महाराजांनी त्या कुंभारकन्येला आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास सांगितले. त्यानुसार विवाह सोहळा होऊन नंतर कुंभारकन्या सती गेली. या विवाह सोहळ्याच्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी सिद्धेश्वर यात्रेत प्रतीकात्मक विवाह सोहळा व इतर विधी पार पाडला जातो. नंदीध्वज हे सिद्धेश्वराच्या योगदंडाचे प्रतीक समजले जाते. मानाचे सात नंदीध्वज आहेत. पहिला नंदीध्वज सिद्धेश्वर देवस्थानाचा, दुसरा कसब्यातील देशमुखांचा, तिसरा लिंगायत माळी समाजाचा, चौथा व पाचवा विश्व ब्राह्मण सोनार समाजाचा तर सहावा आणि सातवा नंदीध्वज मातंग समाजाचा आहे.
होम प्रदीपन सोहळा संपन्न झाल्यानंतर रात्री उशिरा सर्व नंदीध्वज प्रथेप्रमाणे सिद्धेश्वर मंदिराबाहेर डॉ. निर्मलकुमार फडकले नाटय़संकुलानजीक जुन्या ‘भगिनी समाज’ इमारतीजवळ येऊन थांबले. त्या ठिकाणी पूर्वापार परंपरेनुसार भाकणुकीचा कार्यक्रम झाला. मानकरी देशमुखांच्या वासराला दिवसभर उपवास घडवून आणतात. या उपाशी वासरासमोर भाकणुकीच्यावेळी सर्व प्रकारचे धान्य व इतर साहित्य ठेवले जाते. वासराच्या हालचाली, धान्याला केलेला स्पर्श, नैसर्गिक विधी यावर विविध अनुमान काढून शिवानंद हिरेहब्बू हे पुढील वर्षभराचे भाकीत सांगतात. भाकणुकीच्या कार्यक्रमानंतर सर्व नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरात येऊन तेथून परत उत्तर कसब्यात हिरेहब्बू वाडय़ाकडे मार्गस्थ झाले.
आज शोभेचे भव्य दारुकाम
सिद्धेश्वर यात्रेच्या चौथ्या दिवशी उद्या बुधवारी, १५ जानेवारी रोजी होम मैदानावर रात्री ८ वाजता शोभेचे भव्य दारुकाम सादर केले जाणार आहे. या दारुकामाने यात्रेची सांगता होणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्य़ासह सांगली, बीड, नगर आदी भागांतून कलावंत शोभेचे दारुकाम सादर करण्यासाठी हजेरी लावून सिद्धेश्वर चरणी सेवा रुजू करतात. महाराष्ट्रात दुर्मीळ ठरलेल्या व लाखो नेत्रांचे पारणे फेडणाऱ्या शोभेच्या दारुकामाचा सोहळा हे सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. या शोभेच्या दारूकामाचे नियोजन विषय समितीचे सभापती अ‍ॅड.मिलिंद थोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यात्रा फुलून गेली
ग्रामदैवत सिध्दरामेश्वर यात्रेनिमित्त पंचकट्टा व होम मैदान परिसर शेकडो दालनांनी गजबजून गेला आहे. संपूर्ण देशभरातून आलेल्या व्यापाऱ्यांनी दालने थाटून यात्रेकरूंना आकर्षित केले आहे. विविध करमणुकीची साधने, चवदार खाद्य पदार्थ, दुग्धपान व रसपानगृहे, नगरचा प्रसिध्द चिवडा, सोलापूरचा नावाजलेला भाग्यश्री वडा, बालगोपाळांना हवीहवीशी वाटणारी खेळणी, महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने, घरसजावटीच्या वस्तू, झटपट फोटो स्टुडिओ, तांबा व पितळापासून बनविलेल्या विविध दुर्मीळ वस्तू, रेडिमेड कपडे, चटकदार भेळ, दिल्लीची खाजापुरी, मेवा-मिठाईची रेलचेल आहे. तर विविध करमणुकीच्या साधनांमध्ये भोईराज आर्ट अ‍ॅन्ड क्राफ्ट प्रस्तुत आनंद नगरी व त्यातील ‘डायनॉसोर पार्क’चे विशेष आकर्षण आहे. याशिवाय उंच विद्युत पाळणे, टोरा-टेरा, जादूचे प्रयोग, रेल्वे बाबागाडी, ड्रेगन ट्रेन, कटर पिलर, मेरी-गो राऊंड, हँसी घर, मौत का कुँआ, डिस्ने लॅन्ड, लोखंडी ब्रेक डान्स, सेल बो, यासारख्या साधनांचे वेड अद्याप कायम असल्याचे पाहावयास मिळाले. महागाई आकाशाला भिडली असली तरी आपल्या जीवनाच्या रणांगणावरील दररोजची लढाई बाजूला ठेवून आबालवृध्द नागरिक यात्रेचा आनंद लुटत आहेत. त्यातून लाखोंची उलाढाल होत आहे.
 

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून