अंजली दमानियांची उमेदवारी कारणीभूत, मुंबईला मुलाखतीसाठी गेलेले कार्यकर्ते नाराज
आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या प्रभारी अंजली दमानिया यांना लोकसभेसाठी नागपुरातून उमेदवारी दिल्याने ज्येष्ठ समाजसेविका डॉ. रूपा कुळकर्णी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर मुंबईला मुलाखतीसाठी गेलेल्या अनेक स्थानिक कार्यकर्त्यांंनी नाराजी व्यक्त करून वेळ आल्यास आम्ही भूमिका निश्चित करू, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. काही कार्यकर्ते तर नागपुरातून नाहीच तर रामटेकसाठी तरी आमचा विचार होईल या आशेने पक्षाच्या दुसऱ्या यादीकडे आस लावून बसले आहेत.
रविवारी दुपारी दमानिया यांचेच नाव नागपूरसाठी निश्चित करण्यात आले. मुलाखतीसाठी गेलेले अनेक कार्यकर्ते निराश झाले. यावेळी काहींनी दबक्या आवाजात तर काहींनी उघडपणे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दमानिया यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. दमानिया आमच्या नेत्या असल्या तरी त्यांनी स्वत:च स्थानिक कार्यकर्त्यांंचा विचार करणे आवश्यक होते आणि तसे पक्षश्रेष्ठींना कळवायचे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्यांने व्यक्त केली. नितीन गडकरी आणि विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी स्थानिक नेतृत्व हवे होते. दमानिया यांना नागूपरची फारशी ओळख नाही. सामान्य लोकांमध्ये त्या परिचित नाही. त्यामुळे लोकांसमोर जाताना दमानिया यांच्याबाबत जनतेला काय सांगणार असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. दमानिया यांच्या उमेदवारीमुळे काही ठराविक कार्यकर्त्यांंमध्ये उत्साह असला तरी अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून आले. धंतोलीमधील आपच्या कार्यालयात दमानिया यांनी नाराज झालेल्या काही स्थानिक  कार्यकर्त्यांंशी संवाद साधून समजूत काढल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
या संदर्भात आपचे नागपूरचे संयोजक देवेंद्र वानखेडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, दमानिया या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या असल्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यामुळे कार्यकत्यार्ंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोणीही नाराज नसून सगळे उत्साहाने दमानिया यांच्यासाठी काम करतील. पक्षामध्ये जे निवडणूक लढवण्यासाठी पक्षात आले होते असे काही कार्यकर्ते नाराज झाले असतील मात्र पक्षाशी एकनिष्ठ आहे, असे कार्यकर्ते आपसाठी काम करणार आहे. नागपुरात कुणाला आश्वासन दिले नव्हते व कुणाला निवडणुकीत उमेदवारी देऊ असे सांगितले नव्हते. आपकडे नागपुरातून ४० ते ५० अर्ज आले होते. ज्यांनी अर्ज केले होते त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले मात्र कुणालाही आश्वासन दिले नव्हते.
नागपुरातून भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून सातवेळा लोकसभेत निवडून गेलेले विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात निवडणूक लढवायची असल्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी दमानिया यांची निवड करून त्यांना उमेदवारी दिली आहे. दमानिया यांच्या उमेदवारीमुळे पक्षाच्या कार्यकत्यार्ंमध्ये कुठलीही नाराजी नाही. त्यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक नेतृत्वावर आणि कार्यकर्त्यांंवर विश्वास नाही, अशी पक्षाची भूमिका नाही. विरोधी पक्षांकडून त्या बाहेरच्या आहेत असा प्रचार केला जात असला तरी नागपुरातील जनता ही ‘आप’च्या मागे आहे. काँग्रेस आणि भाजपवर जनतेचा आता विश्वास नाही. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केली असून लवकरच मोहल्ला सभाच्या माध्यमातून जनतेसमोर जाणार आहे. जे कार्यकर्ते नाराज झाले आहेत त्यांची समजूत काढून त्यांना विश्वासात घेऊ, असेही वानखेडे म्हणाले.

स्थानिकांवर अविश्वास दाखविल्याची भावना
अंजली दमानिया यांची नागपुरातून उमेदवारी घोषित झाल्यानंतर सोमवारी सकाळी त्या नागपुरात आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्ते कार्यालयात आले असता त्यांनी जिल्ह्य़ातील आणि नागपुरातील कार्यकत्यार्ंशी संवाद साधला. कार्यकर्त्यांंची बैठक आटोपल्यावर काही कार्यकत्यार्ंनी दमानिया यांच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त करून स्थानिक कार्यकत्यार्ंवर अविश्वास दाखवल्यासारखे हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर व्यक्त केली. काही कार्यकर्त्यांंना अर्ज करण्यास सांगितल्यावर ३० ते ३५ कार्यकर्त्यांंना मुलाखतीसाठी मुंबईला बोलविण्यात आले होते. अनेकांच्या मुलाखती घेऊन त्यांची पाश्वभूमी जाणून घेतली होती. काही कार्यकर्त्यांंना तुमचा विचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.