काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाबाबत वाटाघाटी सुरू असताना काँग्रेसने तडकाफडकी बुधवारी रात्री उशिरा ११८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जिल्ह्य़ातील एक माजी केंद्रीय मंत्री, दोन माजी मंत्री, एका विद्यमान मंत्र्यासह पक्षातील तीन वरिष्ठ नेत्यांचे चिरंजीव व एका ज्येष्ठ नेत्याच्या समर्थकाचा समावेश आहे. केवळ वारसदार, मंत्री आणि समर्थकांना उमेदवारी दिल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून त्यातील अनेकांनी पक्ष सोडून जाण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या जागांवर दावे केले होते त्या जागांवरही काँग्रेसने उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जागा वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली.
 नागपूर शहर आणि जिल्हा मिळून १२ विधानसभा मतदारसंघ असताना त्यातील उमरेड, काटोल, हिंगणा आणि कामठी मतदार संघ वगळता काँग्रेसने उर्वरित सर्व मतदारसंघात उमेदवार घोषित केले आहेत. पश्चिम नागपूरमधून विकास ठाकरे, दक्षिण पश्चिम मतदारसंघातून प्रफुल्ल  गुडधे पाटील, मध्य नागपुरातून माजी मंत्री अनिस अहमद, पूर्व नागपुरातून अभिजित वंजारी, दक्षिण नागपुरातून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, सावनेरमधून सुनील केदार, रामटेकमधून सुबोध मोहिते यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काटोल आणि हिंगणा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र, कामठी मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नाही. पूर्व नागपूर मतदार संघातून गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले सतीश चतुर्वेदी यांना यावेळी दक्षिण नागपुरातून उमेदवारी दिली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्व नागपूर मतदारसंघातून भाजपचे कृष्णा खोपडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर त्यांनी गेल्या पाच वर्षांत पूर्व नागपुरात निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करून पक्षाचेसंघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना दक्षिण नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सांगण्यात आले त्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
पूर्व नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे वरिष्ठ नेते गोविंदराव वंजारी यांचे चिरंजिव अभिजित वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोविंदराव वंजारी यांनी ७८, ९९ आणि २००४ मध्ये दक्षिण नागपूरमधून निवडणूक लढविली होती. त्यापैकी ९९ मध्ये ते पराभूत झाले होते. वडिलांचा वारसा समोर चालवावा म्हणून अभिजित वंजारी यांनी दक्षिणमधून उमेदवारी मागितली. मात्र,  त्यांना पूर्व नागपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण नागपुरातून दोनदा प्रतिनिधित्व केलेले दीनानाथ पडोळे यांना मात्र डच्चू देण्यात आला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपुरातून निवडणूक लढणारे माजी मंत्री अनिस अहमद यांना पुन्हा मध्य नागपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. हलबा आणि मुस्लिम मतदारांचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत अनिस अहमद यांनी मध्यऐवजी पश्चिम नागपुरात निवडणूक लढविली होती. मात्र, ते पराभूत झाले. यावेळी त्यांनी सुरुवातीपासूनच मध्य नागपूरसाठी मोर्चेबांधणी केली आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून विरोध असतानाही गॉडफादरच्या माध्यमातून उमेदवारी मिळविली.  
दक्षिण पश्चिम मतदारसंघातून प्रफुल्ल गुडधे पाटील प्रथमच विधानसभा निवडणूक लढवित आहेत. माजी मंत्री विनोद गुडधे पाटील यांचे चिरंजीव प्रफुल्ल गुडधे हे महापालिकेत अभ्यासू नगरसेवक म्हणून समोर आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस याच मतदार संघातून निवडणूक लढणार असल्यामुळे प्रफुल्ल गुडधे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
माजी महापौर विकास ठाकरे दरवेळी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून वरिष्ठाच्या माध्यमातून प्रयत्न करीत असताना यावेळी मात्र त्यांनी अभी नही तो कभी नही अशी भूमिका घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि मुख्यमंत्र्यांचा विरोध असताना पश्चिम नागपुरातून ते निवडणूक लढणार आहेत. विलास मुत्तेमवार यांचे खंदे आणि निष्ठावंत समर्थक  म्हणून ठाकरे यांचा लौकिक आहे.
सलग तीनवेळा उत्तर नागपुराचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत पुन्हा उत्तर नागपुरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांकडून डॉ. राऊत यांना विरोध होता. त्या संदर्भात पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडे काही कार्यकर्त्यांंनी उमेदवारी देऊ नका, असे निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतरही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  
रामटेक मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते आणि सावनेरमधून सुनील केदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुबोध मोहिते गेल्यावेळी निवडणूक लढले होते. मात्र, पराभूत झाले होते यावेळी ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माजी मंत्री आणि सहकारमहर्षी बाबासाहेब केदार यांचे चिरंजीव सुनील केदार यांनी यापूर्वी दोन वेळा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केल्यानंतर तिसऱ्यांदा ते मैदानात उतरले आहेत. जिल्हा सहकारी बँकेच्या घोटाळ्यामुळे केदार यांचे नाव चांगले चर्चेत असल्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.