सकाळपासूनच वरुणराजाची रिमझिम, मधूनच जोराच्या सरी अशातच ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा गजर घुमणारा ढोलताशाचा आवाज अशा मंगलमय वातावरणात गणेश विसर्जन मिरवणुकीस पंढरीत सुरुवात झाली. रात्री साडेबारा वाजता विसर्जन मिरवणूक समाप्त झाली.
पावसातही गणेशभक्तांचा उत्साह अमाप होता. विसर्जन मिरवणुकीत लेझीम पथक, ढोलताशाचे विविध प्रकार, सुंदर देखावे पाहण्यास स्टेशन रोड, चौफाळा, नाथ चौक या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. चंद्रभागा नदीत गणेश विसर्जनास जाणा-या गणेशाचे पुष्पहार घालून, तर मंडळाच्या अध्यक्षांना फेटा बांधून स्मृतिचिन्ह देऊन आमदार भारत भालके व त्यांचे सहकारी स्वागत करत होते. गोपाळकृष्ण मंदिर चौफाळा येथे गणेश मंडळाचे स्वागत एस. टी. महांडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक हे प्रशस्तिपत्र फेटा बांधून सत्कार व स्वागत करत होते. या वेळी गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. पोलीस बंदोबस्त चोख होता.