सहकारी महिला शिक्षिकेशी असभ्य वर्तन करून मानसिक छळ करणाऱ्या वादग्रस्त मुख्याध्यापक निळकंठ चोंडे याच्या निलंबनाचे आदेश अखेर जारी करण्यात आले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांनी सर्व दबाव झुगारून देत ही कारवाई केल्याने महिला कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
शहरातल्या चौफाळा येथील जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक निळकंठ चोंडे शाळेतल्या महिला शिक्षिकेशी असभ्य वर्तन करतात, अपंग शिक्षिकेशी उद्धट वागतात यासह सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये त्याने अपहार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. चोंडे हे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असल्याने या तक्रारीचा काही परिणाम होणार नाही, अशा आविर्भावात ते व त्यांचे समर्थक होते. मात्र,
तक्रारीचे गंभीर स्वरूप पाहता नांदेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी के. पी. सोने यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला. चोंडे याच्या गरकारभाराने गटशिक्षणाधिकारी अवाक झाले. चोंडेविरुद्ध केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट करून त्यांनी चोंडेवर निलंबनाची कारवाई करावी, असे अहवालात म्हटले होते.
या अहवालावर तातडीने कारवाई होईल असे वाटत होते. पण जि.प.चे अध्यक्ष व दोन सदस्यांनी चोंडेवर कारवाई होऊ नये, या साठी दबाव आणला. काही संघटनाही कोणतीही खातरजमा न करता चोंडेवरील कारवाई टळावी, या साठी सक्रिय झाल्या होत्या. शेवटी दोन्ही बाजूंनी दबाव वाढल्यांनतर सीईओ भांगे यांनी शुक्रवारी या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी ठेवली. चौफाळा शाळेतील सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे म्हणणे ऐकल्यानंतर सायंकाळी चोंडेच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.
कारवाईला उशीर झाला असला, तरी या आदेशाने मनमानी व एकाधिकारशाहीपणे काम करणाऱ्या सर्वाना चांगली जरब बसेल, अशी प्रतिक्रिया महिला शिक्षिकांनी व्यक्त केली.