वकील हा न्यायप्रणालीत महत्त्वाची भूमिका बजावत असून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याची वकिलांवर जबाबदारी असते. आपला मुद्दा समाजातील व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी व्यवस्थित मांडता येणे आवश्यक आहे. त्यासाठी संवादकौशल्य वाढवायला पाहिजे. त्याचा फायदा वकिली करताना होईल, असा उपदेश मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी केला.
विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयाच्यावतीने ११व्या जस्टा कॉझा विधि महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, न्या. एस.आर. डोणगावकर आदी उपस्थित होते.
देशाचा, जगाचा इतिहास, साहित्य यांचे वाचन कायद्याच्या अभ्यासाव्यतिरिक्त  आवश्यक आहे. समाजाच्या विशिष्ट घटकाचा आजही विकास झाला नसून त्याच्यापर्यंत न्यायव्यवस्था पोहचली नाही. त्यामळे अवांतर वाचनाची गरज त्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असून त्याचा वकिलीत उत्तम उपयोग करता येऊ शकतो, असे णार्गदर्शन करताना न्या. प्रसन्ना वराळे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी अधिकाधिक तंत्रज्ञनाचा उपयोग वकिली व्यवसायात उपयोग करण्यावर भर दिला पाहिजे.  त्यामुळे वेळेची बचत होऊन कार्यक्षमता अधिक वाढते असे विचार कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी व्यक्त केले. इन्स्टिटय़ूट ऑफ लॉ या हैदराबादच्या निरमा विद्यापीठाने स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले तर उपविजेतेपदावर हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्‍‌र्हसिटीला समाधान मानावे लागले.
इंडियन लॉ स्कूल, पुण्याची विद्यार्थिनी मधुमिका मूर्ती हिला उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार गौरविण्यात आले. सर्व विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र, रोख पारितोषिक देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन रोहिणी जयस्वाल आणि अभिषक शुक्ला यांनी केले. प्रा. प्रवीण बागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी राहुल मेश्राम, साजेदा शेख, नाझिया पठाण, अंकिता उमराव यांनी विशेष सहकार्य केले.