देशाच्या विविध भागांत करदात्या जनतेच्या पैशातून अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली सहली काढणाऱ्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नगरसेवकांनी ‘सभाशास्त्र, शहर विकास, लोकप्रतिनिधींची कार्य आणि जनसंपर्क’ या विषयांवर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांनी उत्तन (भाईंदर) येथे प्रबोधिनीमध्ये आयोजित दोन दिवसांच्या ‘बौद्धिक’ प्रशिक्षणाला दांडी मारली. अन्य पालिकांमधील नगरसेवकांचीही जेमतेमच उपस्थिती होती.  
देशाच्या विविध भागांत अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली दौरे निघाले की, कल्याण-डोंबिवली पालिकेतील काही नगरसेवकांच्या जनतेच्या पैशावर निघणाऱ्या सहलीला जाण्यासाठी उडय़ांवर उडय़ा पडतात. गेल्या चार वर्षांत अशा प्रकारच्या आठ ते नऊ दौऱ्यांवर पालिकेने आतापर्यंत सुमारे १५ लाख रुपयांचा चुराडा केला आहे. हे पालिकेच्या कागदपत्रांवरून दिसून येते. या दौऱ्यांमधून कोणतीही फलनिष्पत्ती झाली नाही की प्रत्येक दौऱ्याचा अहवाल सहभागी नगरसेवकांनी प्रशासनाला देऊन अन्य प्रांतांत पाहिलेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले नाही.
लोकप्रतिनिधींची मूलभूत कर्तव्य विषयावर अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्था व म्हाळगी प्रबोधिनीतर्फे नुकतेच उत्तन येथील प्रबोधिनीत मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ातील महापालिकांमधील नगरसेवकांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. कल्याण-डोंबिवली पालिकेतून या प्रशिक्षणासाठी सर्व पक्षीयांमधील एकूण ३९ नगरसेवकांनी नाव नोंदणी केली होती.
प्रत्यक्षात प्रशिक्षणाच्या दिवशी सर्व पक्षीयांमधील मनसेचे नगरसेवक वगळता राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेसचे फक्त नऊ नगरसेवक ‘स्वखर्चाने’ स्वत:च्या वाहनाने कार्यशाळेच्या ठिकाणी उपस्थित राहिले. दुसऱ्या दिवशी सात नगरसेवक उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या माधुरी काळे, उमेश बोरगावकर, दर्शना म्हात्रे, जीवनदास कटारिया, शिवसेनेच्या रेखा जाधव, प्रतिमा जाधव, भाजपचे राहुल दामले, श्रीकर चौधरी, काँग्रेसचे विश्वनाथ राणे यांनी या दोन दिवसांच्या शिबिराला उपस्थिती लावली. दुसऱ्या दिवशी यामधील दोन पदाधिकाऱ्यांनी पालिकेतील ‘कार्यबाहुल्यां’मुळे फक्त उपस्थिती लावून पळ काढल्याचे बोलले जाते.
स्वत:च्या खिशावर भार पडणार असेल तर दांडी आणि जनतेच्या पैशावर मात्र उडय़ा अशीच नगरसेवकांची मानसिकता या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उघड झाली असल्याचे बोलले जाते. मनसे नगरसेवक विकासक होण्याचे धडे मोठय़ा विकासकांच्या हाताखाली गिरवत असल्याने त्यांना या प्रशिक्षणाचे महत्त्व काय पटणार, असे नागरिकांमध्ये बोलले जाते.