अविश्रांत कोसळलेल्या पावसाने जिल्ह्य़ातील सोयाबीनची नासाडी झालेली असतानाच दुसरे महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या कपाशीवर आता बुरशीसारख्या मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
जिल्ह्य़ात पेरणीयोग्य क्षेत्र साडे आठ लाख हेक्टर आहे. पकी सव्वातीन लाख हेक्टरक्षेत्रात सोयाबीनचा पेरा आहे तर ३ लाख, ६० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीचा पेरा आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच कोसळलेल्या पावसाच्या धारांनी विश्रांती म्हणून घेतलीच नाही. तशातही परतीच्या पावसाने इतका हाहाकार माजवला की तोडांशी आलेल्या सोयाबीनचा सत्यानाश केला. आता कपाशीच्या पिकावर ‘पॅराविल्ट’ अर्थात मर रोगाचे आक्रमण झाले आहे.
 जिल्ह्य़ातील कळंब, बाभूळगाव, वणी, झरी मारेगाव, पांढरकवडा, उमरखेड, महागाव इत्यादी तालुक्यांत कपाशीवरील मर रोगांमुळे शेतकऱ्यांचे प्राण कंठास आले आहेत. या रोगामुळे पऱ्हाटीची पाने गळू लागतात आणि झाड निष्पर्ण होते त्यामुळे पात्या आणि बोंडसुध्दा गळून जातात.
शेतकऱ्यांच्या कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट होऊन शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होते. पिकाला तातडीने युरिया देऊन बुरशीनाशक फवारणी झाली नाही तर नुकसानीच्या मर्यादेची सीमाच उरत नाही. जिल्ह्य़ाातील विविध तालुक्यांत ‘क्रॉपसॅप’ अर्थात पीक सरंक्षण संयत्रणेमार्फत जनजागृती मोहीम हाती घेण्यात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले  जात आहे, असे पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक अधिकारी डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी जिल्ह्य़ातील काही तालुक्यांचा दौरा करून आल्यावर ‘लोकसत्ता’ला सांगितले.
‘ओला दुष्काळ जाहीर करा’
जिल्ह्य़ात सोयाबीनचे पीक हातचे गेले. नगदी पीक असलेले कापसाचे पीकही मर रोगामुळे धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे अशा स्थितीत सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू डांगे यांनी केली आहे. शिवसेना खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांनी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करणार असल्याची आणि प्रसंगी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची तयारी असल्याचे आमदार संदीप बाजारिया यांनी म्हटले आहे. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या स्थितीची माहिती विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून यापूर्वीच दिली आहे.