हंगामाच्या शेवटी कापूसदराची घोडदौड सुरू झाली आहे. परभणीसह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कापसाचे भाव वधारत चालल्याने कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बुधवारी परभणीच्या बाजारपेठेत कापसाला यंदाच्या हंगामातील सर्वोच्च ५ हजार १९५ रुपये भाव मिळाला. दरम्यान, कापसाची दरवाढ सुरू झाल्याने आणखी वाढीच्या अपेक्षेने बाजारात कापूस आणण्यास शेतकरी टाळत आहेत.
जिल्ह्यात यंदा कापसावर लाल्या रोगाने विळखा घातला आणि कापसाचे दरही स्थिर राहिले. त्यामुळे कापूस उत्पादक अडचणीत आले. ४ हजार ६०० रुपय भावाने खरेदी हंगाम सुरू झाला. मध्यंतरी ४ हजार ८०० रुपयांपर्यंत कापसाचे दर पोहोचले होते. त्यापुढे मात्र दरवाढ होत नव्हती. हंगाम संपत आला, तरी कापसाचे भाव वाढत नसल्याने शेतकरी चिंतातुर होते. अनेकांनी याच दरात कापूस घातला. काहींनी मात्र दरवाढीची वाट पाहिली. गेल्या दोन दिवसांपासून परभणी, मानवत व सेलूच्या बाजारपेठांतून कापसाची दरवाढ सुरू झाली आहे. मंगळवारी मानवत येथे ५ हजार ८ रुपये, सेलू येथे ५ हजार १००, तर परभणीत ५ हजार १२५ रुपये दराने कापसाची खरेदी झाली.
गेल्या तीन-चार दिवसांत अन्य राज्यांच्या कापूस बाजारपेठेतील दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. हीच दरवाढ आता परभणीतही होऊ लागली आहे. याच आठवडय़ात सोमवारी कापसाचा भाव ४ हजार ९७५ रुपये होता. मंगळवारी यात १०० ते २२५ रुपयांची वाढ होऊन बुधवारी ती ५ हजार १९५ रुपयांवर पोहोचली. परभणी बाजारपेठेत २ जानेवारीला ४ हजार ८४५ रुपये, ३ जानेवारीला ४ हजार ८९०, ४ जानेवारीला ४ हजार ९७५, मंगळवारी ५ हजार १२५ व बुधवारी ५ हजार १९५ रुपये दराने कापसाची खरेदी झाली. दोन दिवसांत ६ हजार क्विंटल कापसाची आवक झाली. परभणी बाजारपेठेत आतापर्यंत १ लाख ९० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. आणखी भाववाढीच्या आशेने शेतकरी कापूस विक्रीस आणण्यास टाळत आहेत. अजूनही शेतकऱ्यांना साडेपाच हजार रुपये दराची अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत हे दर साडेपाच हजारांपर्यंत जातील, असे जाणकर सांगतात.