‘‘स्वातंत्र्य आणि सुधारणा हा वाद स्वातंत्र्यपूर्व काळात चर्चेत होता. आज देशाला समाज सुधारणेची जेवढी आवश्यकता आहे तेवढीच आवश्यकता देशभक्तीची भावना रूजविण्याची आहे. जाती, धर्म, भाषा, भौगोलिक प्रांत या भूमिका हल्ली इतक्या प्रकर्षांने मांडल्या जातात की यातून सवड मिळाली तर आपण आपल्या देशाचे असतो, ’’ असे मत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त त्यांचा ‘वनराई’चे अध्यक्ष मोहन धारिया आणि आर. आर. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ विजय भटकर, ‘सिंबायोसिस’ चे संस्थापक शां. ब. मुजुमदार,  पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, टिमविचे उपाध्यक्ष न्या. विश्वनाथ पळशीकर, उमेश केसकर, रोहित टिळक या वेळी उपस्थित होते. या वेळी ‘इंदुकिरण’ या टिळक यांच्या लेखसंग्रहाचे भटकर यांच्या हस्ते, तर टिळक यांच्या जीवनावरील ‘कुलदीपक’ या स्मरणिकेचे पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ‘‘राजकारणाकडे काही लोक धंदा म्हणून पाहतात, तीच गोष्ट प्रसारमाध्यमांची आहे. माध्यमांमध्ये प्रखर देशभक्त असे किती मालक आहेत याचा शोध घ्यायला हवा. दीपक टिळक यांनी लोकमान्य टिळकांचा वारसा जोपासत त्यांच्या परंपरेला साजेशी कामगिरी करून दाखविली,’’ असे पाटील म्हणाले. लोकमान्य मल्टिपर्पझ को. ऑप. सोसायटीच्या वतीने टिळक यांना सामाजिक कार्यासाठी सहा लाख एकशे अकरा रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.