सदोष वॉशिंग मशीन विकल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने ‘वर्लपूल’ कंपनीसह प्रभादेवी येथील ‘सोनी-मोनी’ या दुकानचालकालाही दोषी धरत चांगलाच दणका दिला. तक्रारदाराला मशीनची १३,३०० रुपये किंमत, १० हजार रुपये नुकसानभरपाई आणि मानसिक त्रासापोटी ३ हजार रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
वडाळा येथील रहिवासी लक्ष्मी शेट्टी यांनी या संदर्भात केलेल्या तक्रारीवर न्यायालयाने हा निर्णय दिला. शेट्टी यांच्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने दोन्ही प्रतिवाद्यांना नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. परंतु दोघांनीही नोटिशीला उत्तरही दिले नाही तसेच त्यांचे कोणी प्रतिनिधीही न्यायालयासमोर हजर झाले नाहीत.
शेट्टी यांनी आपला दावा सिद्ध करण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे लक्षात घेत न्यायालयाने ‘वर्लपूल’ला सदोष मशीनचे उत्पादन केल्याप्रकरणी तर ‘सोनी-मोनी’ला ती विकल्याप्रकरणी दोषी धरत मशीनची रक्कम परत करण्यासह नुकसानभरपाई आणि मानसिक त्रास दिल्याबाबतची भरपाई देण्याचेही बजावले.
शेट्टी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी मार्च २०१२ मध्ये प्रभादेवी येथील ‘सोनी-मोनी’ या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंच्या दुकानातून वॉशिंग मशीन खरेदी केले होते. परंतु मशीनमध्ये सातत्याने तांत्रिक दोष निर्माण होत असल्याचे आढळून आल्यावर शेट्टी यांनी दुकानदार आणि उत्पादक दोघांशीही संपर्क साधून त्याची माहिती दिली. त्यावर मशीनमधील दोष दूर करण्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे शेट्टी यांना सांगण्यात आले. त्यानंतरही मशीनमधील काही तांत्रिक दोष काही दूर झाला नाही. अखेर या दुरुस्तीसत्राला कंटाळून शेट्टी यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती.