शेतीच्या नोंदीची फेरफार व सातबारा देण्यासाठी एका शेतकऱ्याकडून दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठी सानपविरुध्द देऊळगावराजा येथील पोलिस ठाण्यात मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारासगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
देऊळगावराजा तालुक्यातील गोळेगाव येथील शेतकरी शिवाजी त्र्यंबक बरडे (३५) यांची तुळजापूर शिवारात शेत सव्‍‌र्हे नंबर ६५,६६,६७ मधील चार एक व ३६३ सव्‍‌र्हे नंबरमधील अडीच एकर शेतीच्या खरेदीवरून फेरफार नोंद व सातबारा उतारा देण्याची रीतसर मागणी तुळजापूर येथील तलाठी प्रताप सानप यांच्याकडे केली होती. त्यावर तलाठय़ाने शेतकरी बरडे यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर या शेतकऱ्याने ६ जूनला बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ जूनला तक्रारकर्त्यांसोबत सरकारी पंच पाठविले.  या पंचासमक्ष या लाचखोर तलाठय़ाने शेतकऱ्याकडे पुन्हा दहा हजार रुपयांची मागणी केली. तत्पूर्वी तलाठय़ाचे बोलणे पंचांनी मोबाईलमध्ये व्हाईस रेकॉंर्डिग केले होते.  दुसऱ्या दिवशी पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला असता या तलाठय़ाने आपण जालना येथे असून १८ जूनला घरी या, असे सांगितले.  ठरल्यानुसार तक्रारकर्ता शेतकरी व पथकाचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले. परंतु, याची कुणकुण लागताच तलाठय़ाने पथकाचे कर्मचारी येण्यापूर्वीच घरातून पलायन केले. मंगळवारी चारच्या सुमारास पंचाच्या व्हाईस रेकॉर्डिवरून पोलिस ठाण्यात तलाठी प्रताप सानप यांच्याविरुध्द गुन्हा दाखलकेला. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलिस अधीक्षक आर.एस.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक एस.एल. मुंढे, पोलिस निरीक्षक एस.बी.वानखेडे, एस.एम.शेगोकार, शेख मोबीन, शैलेंद्रसिंह ठाकूर, चैतन्य बाळसराफ, प्रदीप गडाख, निलेश सोळंके, सुनील राऊत, मनोज राजनकर, सतीश ढोकणे, संतोष यादव, शेख जावेदव सुखदेव ठाकरे या कर्मचाऱ्यांनी केली आहे.