बार्शी येथे सोने-चांदीच्या ठोक व्यापा-याने व्यवहारापोटी एका सराफाने दिलेल्या २५ लाखांच्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित व्यापा-याविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात फसवणूक तथा विश्वासघात केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
नंदू ऊर्फ सत्यजित संपतराव पाटील (रा. मुरलीधर बोळ, बार्शी) असे या गुन्हय़ातील संशयित आरोपीचे नाव आहे. आनंद संपतराव भोसले (रा. सुभाषनगर, बार्शी) या सराफाने या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी नंदू पाटील हे सोने-चांदीचे ठोक व्यापारी आहेत. भोसले यांनी पाटील यांच्याकडे सोने-चांदीचा माल आणून देण्यासाठी २५ लाखांची रोकड दिली होती. दोन-तीन दिवसांत ठरल्याप्रमाणे सोने-चांदी देण्याचे ठरले होते. परंतु पाटील यांनी भोसले यांना सतत झुलवत ठेवले. त्यामुळे भोसले यांनी पाटील यांच्या दुकानी व त्यांच्या मूळ गावी जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथेही त्यांची भेट झाली नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जामखेड येथील एका सराफाने पाटील यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याची फिर्याद नोंदविल्याचे समजले. त्यामुळे भोसले यांनीही आपली फसवणूक तथा विश्वासघात झाल्याची खात्री पटताच थेट बार्शी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली.