News Flash

विधिमंडळाच्या सजावटीवर पुन्हा कोटय़वधीचा खर्च

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ९ डिसेंबरपासून सुरू होत असल्यामुळे परिसराची रंगरंगोटी करण्यासोबतच विधानभवनाचा आतील

| November 28, 2013 09:25 am

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ९ डिसेंबरपासून सुरू होत असल्यामुळे परिसराची रंगरंगोटी करण्यासोबतच विधानभवनाचा आतील आणि बाहेरील परिसर आकर्षक व सुशोभित करण्यासाठी सजावटीवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी आकर्षक अशी विविध प्रजातींची झाडे लावल्यानंतर ती वर्षांतच खराब झाल्याने पुन्हा एकदा नव्याने विधिमंडळाचा समोरील आणि मागचा भाग सुशोभित करण्यात आला असून त्यावर कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत.
यावेळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रवेशद्वारावर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे फूल देऊन स्वागत करण्यात येणार आहे. एकीकडे जनता महागाईने त्रस्त आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना केवळ सजावटीवर कोटय़वधी रुपये खर्च केले जात असल्याचे दिसून येत आहे. हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या सरबराईसाठी गेल्या दोन महिन्यापासून विधानभवन परिसरात जय्यत तयारी सुरू असून पाचशेपेक्षा अधिक कर्मचारी त्यासाठी दिवस-रात्र राबत आहेत.
विधिमंडळ परिसरात असलेल्या जुन्या लॉनचे स्वरूप बदलवून त्या ठिकाणी विविध रंगाच्या व प्रजातीच्या फुलांनी हा परिसर सजविण्यात आला आहे. यात विविध फुलांच्या प्रजाती विधिमंडळ परिसरातील लॉनवर लावण्यात आलेल्या आहेत. ही सर्व झाडे पुणे आणि कोकणातून बोलविण्यात आली आहेत. याशिवाय, विधिमंडळ इमारत आणि परिसरातील सुशोभिकरणावर भर देण्यात येत आहे.   परिसरातील प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यालय आणि बाहेरील परिसर सुशोभित केला जात आहे. विधानसभेच्या मागील भागात असलेले लॉन सुशोभित केले जात असून त्या ठिकाणी केवळ मंत्र्यांना आणि लोकप्रतिनिधींना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. झाडांना आकार देणे, लॉन कटिंग, नवीन झाडे लावण्याचे काम परिसरात सुरू असून त्यासाठी खास पुणे आणि नागपुरातील ५० पेक्षा अधिक कारागीर काम करीत आहेत. परिसरात सहा ठिकाणी लँडस्केपिंग करण्यात येणार आहे.
यात दादासाहेब कन्नमवारांचा पुतळा, प्रवेशद्वाजवळील पिंपळाच्या झाडांचा समावेश आहे. दरवर्षी विधानभवनाची सुरक्षा म्हणून परिसरात बंदोबस्तासाठी भोवताल टीनपत्रे लावली जात होती. मात्र, यावर्षी सुरक्षा भिंत उंच करण्यात आली असून त्यावर ग्रील लावण्यात आले आहे. याशिवाय, प्रत्येक मंत्र्याच्या खोल्यासमोर शोभेची झाडे असलेल्या कुंडय़ा ठेवल्या जात आहेत.
विधिमंडळ परिसरात गेल्या वर्षी कार्पोरेट दर्जाच्या कॅबिनेटच्या बैठकीसाठी सभागृह तयार करण्यात आले होते. या सभागृहाबाहेर आणि आतही फुलांची सजावट केली जाणार आहे. प्रत्येक मंत्र्यांच्या खोल्यांमध्ये एलसीडी मॉनिटर लावण्यात आले आहे. कॅबिनेटच्या बैठकीसाठी असलेले सभागृहासोबत मंत्र्यांच्या खोल्या वातानुकूलित राहणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या परिसरातील कार्यालयासमोर होणारी गर्दी बघता त्या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. विविध समितीच्या कार्यालयांना ‘कार्पोरेट लुक’ देण्याचा प्रयत्न केला
जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2013 9:25 am

Web Title: crores fund for renovation and beautification of legislative assembly in nagpur
Next Stories
1 अमरावती जिल्ह्य़ात जीवनदायी योजनेचे साडेचार कोटी थकित
2 मक्याच्या किमती डिसेंबर-जानेवारीत वाढण्याची शक्यता
3 राज्यात ध्वजदिन निधी संकलनाचे २३ कोटींचे लक्ष्य
Just Now!
X