कथक नृत्याचे सम्राट पं. बिरजू महाराज फेब्रुवारीत पंचाहत्तरीत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त ‘कलासंगम’ या संस्थेतर्फे गुरुवार, १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता षण्मुखानंद सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने नृत्य-गायन आणि वादनाची अनोखी संगीत मैफल मुंबईकर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.  लखनौ कालका-बिंदादिन कथक घराण्याचे पं. बिरजू महाराज यांनी कथक नृत्यप्रकार देशात आणि जगभरात पोहोचविला. नृत्याचे शेकडो कार्यक्रम तसेच नृत्य प्रशिक्षक म्हणूनही त्यांची कामगिरी मोठी आहे. पद्मविभूषण, कालिदास सन्मान, संगीत नाटक अकादमी असे मानाचे पुरस्कार पं. बिरजू महाराज यांना मिळाले आहेत. गुरुवारच्या कार्यक्रमात दस्तुरखुद्द पं. बिरजू महाराज यांचा नृत्याविष्कार पाहायला मिळणार असून उस्ताद झाकिर हुसैन त्यांना तबल्यावर साथसंगत करणार आहेत. त्याचबरोबर या वेळी पतियाळा घराण्याचे गायक पं. अजय चक्रवर्ती यांचे ठुमरी गायन ऐकायला मिळेल. ठुमऱ्यांमधील भाव बिरजू महाराज अभिनयाद्वारे दाखविणार असून त्याचवेळी लयीचे विभ्रम उस्ताद झाकिर हुसैन दाखविणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका षण्मुखानंद सभागृहात उपलब्ध आहेत.